मुंबई :विधानसभा नवनियुक्त हक्कभंग समितीची आज बैठक होणार आहे. खासदार संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग मांडला, या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. समितीचे अध्यक्ष राहुल कूल यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवस चर्चा झाली. ही चर्चा करताना विरोधी पक्षाच्या आमदारांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढीव वीज दर आणि महागाई यावरती विरोधक आक्रमक राहणार आहेत.
राजकीय मुद्द्यांवरूनच चर्चा :विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा आणि पुरवण्या मागण्यांवरील चर्चा झाली. राज्याच्या हिताच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली होती. काही मुद्दे मांडले गेले. अभिभाषणाच्या चर्चेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक आमदारांनी प्रश्न मांडले. सत्ताधाऱ्यांनीही काही बाबतीत जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर मुद्दे मांडले, मात्र मुख्यत्वे राजकीय मुद्द्यांवरूनच चर्चा झाली.
एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करीत आपल्याला एक महिन्याच्या आत जेलमध्ये टाकण्यासंदर्भात त्यांनी काही अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचा दावा केला होता. तसेच आपल्या कुटुंबालाही त्रास देण्यात येणार असल्याचे समजल्याने त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. तुम्ही आमचा पक्ष संपवला आमचे धनुष्यबाण घेतले. मात्र, आम्ही तुमच्यापुढे गुडघे टेकणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला होता. यामुळे पुन्हा सभागृहाचे वातावरण तापले होते.