महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 27, 2023, 9:45 PM IST

Updated : Feb 27, 2023, 10:34 PM IST

ETV Bharat / state

Maha Budget Session 2023 : अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 'तेरी भी चूप मेरी भी चूप'; राज्यपालांच्या हिंदी अभिभाषणाचा विरोधकांकडून निषेध

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. दोन्ही सभागृहाचे पहिल्या दिवसाचे कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

Maharastra Budget Session 2023
महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन

सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते प्रतिक्रिया व्यक्त करताना

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही अधिवेशनामध्ये पहिल्या दिवसापासून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जाते. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नेहमी विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तसेच जनतेच्या विविध प्रश्नांवर आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात सरकार विरोधात आंदोलन केले जाते. दरवर्षी पायऱ्यांवरील आंदोलन हा ठरलेला कार्यक्रम असतो. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर कोणताही हल्लाबोल केलेला पाहायला मिळाला नाही.

राज्यपालांचे अभिभाषण: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्चपर्यंत चालणार असून पहिल्या दिवशी राज्यपाल रमेश बैस यांचे अभिभाषण झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी 'जय महाराष्ट्र' असा नारा देत भाषणाला सुरुवात केली. 'जय जय महाराष्ट्र माझा' राज्य गीतामुळे आपली अपेक्षा पूर्ण झाली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद संदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला न्यायप्रविष्ठ आहे, यामुळे महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडली जाईल, अशी ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी दिली. तसेच सीमावरती भागामध्ये राहणाऱ्या मराठी भाषकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असल्याचेही राज्यपाल बैस यांनी सांगितले.

जनतेसाठी काम करतोय - आदित्य ठाकरे

महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणातून राज्य सरकारने केलेल्या विकास कामांचा आढावा आणि भविष्यात सरकारकडून केल्या जाणाऱ्या विकास कामाचा उल्लेख करण्यात आला. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारवे नवे राज्यपाल रमेश बैस यांची दिशाभूल केली आहे. राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाचा समावेश करण्यात आला असल्याचा आरोप माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. राज्याच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही शेतकरी तसेच राज्यातील सामान्य नागरिकांचे प्रश्न राज्य सरकार समोर मांडणार आहोत. ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, यामुळे कार्यालय मिळेल का नाही, याबाबत आम्ही चिंता करत नाही. आम्ही सामान्य जनतेतली लोक असल्याचे ठाकरे म्हणाले आहेत.

अभिजात भाषेचा दर्जा का नाही? - छगन भुजबळ

मराठी भाषा ही 2500 पेक्षा अधिक जुनी आहे मराठी ही संस्कृत पेक्षाही जुनी भाषा असल्याचे दाखले, यापूर्वी देण्यात आले आहेत. दुर्गा भागवत यांनी यासंदर्भात संशोधन केले आणि त्यानंतर त्यांनी त्याबाबतीत अधिक माहिती दिलेली आहे. मराठी भाषा अभिजात दर्जा मिळवण्यासाठी सर्व निकष पूर्ण करते. दक्षिणेतल्या काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळतो, मात्र मराठीला का नाही? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापही तो मिळत नाही, असा मुद्दा आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला.

पंतप्रधानांची भेट घेणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात माहिती देताना सांगितले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पंतप्रधान मोदी यांची शिष्टमंडळातर्फे भेट घेऊन त्यांना विनंती करू. या शिष्टमंडळामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार असतील पंतप्रधानांना भेटल्यानंतर मराठी भाषेला नक्कीच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात व्यक्त केला.

शिंदे - फडणवीस सरकारने काय केले?:अंबादास दानवे पुढे म्हणाले की, राज्यपालांनी आज हिंदीमध्ये केलेले भाषण हे एक प्रकारे दुर्दैवी आहे. आज मराठी भाषा दिनीच्या दिवशी त्यांनी मराठीमध्ये भाषण करायला हवे होते. तसेच या भाषणांमध्ये अर्ध भाषण हे केंद्र सरकारने केलेल्या कामाविषयी व अर्धे भाषण हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाविषयी होते. तर मग शिंदे - फडणवीस सरकारने नेमके काय केलं?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

शिंदे गटाकडून व्हीप नाही:राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिंदे गटाकडून शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांना व्हीप जारी करण्यात आल्याची चर्चा जोरात रंगली आहे. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, अशा पद्धतीने कुठलाही व्हीप जारी करण्यात आलेला नाही. फक्त अशा पद्धतीच्या चर्चा करून दिशाभूल करण्याचे काम शिंदे गटांकडून करण्यात येत आहे. जर त्यांनी अशा पद्धतीचा व्हीप जारी केला असेल तर तो त्यांनी दाखवावा, असे सांगत ते अशा पद्धतीचा व्हीप जारीच करू शकत नाही, असे दानवे म्हणाले आहेत.

विरोधकांकडे मुद्दे नाहीत - भरत गोगावले

विरोधकांनी केलेल्या आरोपावरून शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले की, विरोधकांकडे सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी कुठलेही मुद्दे नाहीत. त्यामुळे कशासाठी घोषणाबाजी करायची, हा प्रश्न समोर असल्यामुळे आणि सरकार जनतेच्या हिताच्या घोषणा करीत असल्यामुळे विरोधकांकडून यावेळी घोषणाबाजी पाहायला मिळाली नाही, असे आमदार गोगावले म्हणाले.

राज्यपालांचा निषेध केला- भाई जगताप

कॉंग्रेसचे विधान परिषद आमदार भाई जगताप यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या राज्यपालांच्या अभिभाषणावरून टीका केली. ते म्हणाले की, राज्यपाल रमेश बैस यांनी आपले अभिभाषण हिंदी भाषेत केले. राज्यपालांच्या या कृतीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध केला आहे. मराठी भाषा दिनी राज्यपालांचे अभिभाषण हिंदीत ऐकण्याची आमदारांवर नामुष्की ओढवली. त्यामुळे राज्यपालांच्या या कृतीचा आम्ही निषेध केला आहे. तसेच हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे सरकारच्या विरोधात पहिल्या दिवशी घोषणाबाजी केली नाही. आम्ही उद्यापासून सरकारच्या विरोधात आमचे आंदोलन करणार आहोत, अशी माहिती काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी दिली.

हेही वाचा: Ambadas Danve in Budget Session : शिंदे गटाने कुठलाही व्हीप जारी केलेला नाही; अंबादास दानवेंचे स्पष्टीकरण

Last Updated : Feb 27, 2023, 10:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details