माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री मुंबई :अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा हा पहिला अर्थसंकल्प होता. अवकाळी पाऊस, नापिकी आणि शेतमालाचे कोसळलेले भाव यामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना, बजेटमध्ये बळीराजासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तसेच, महिलांसाठीही अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. याशिवाय शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रत्येक समाजासाठीही तरतूद करण्यात आली आहे.
विविध समाजातील तरुणांसाठी तरतूद : आजच्या अर्थसंकल्पात विविध समाजातील तरुणांना न्याय देण्याचे काम केले आहे. यामध्ये लिंगायत समाजातील तरुण सुशिक्षित बेरोजगार आणि नवोद्योजकांना स्वयं उद्योग अर्थसहाय्य देण्यासाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच, गुरव समाजासाठी संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले जाणार आहे.
भागभांडवल देणार : यामध्ये वडार समाजासाठी पैलवान कैलासवासी मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ यांची महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय विकास महामंडळअंतर्गत स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. ही महामंडळे विविध कल्याणकारी योजना राबवतील. तसेच, त्यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपये अधिकृत भाग भांडवल देण्यात येईल, अशी घोषणाही फडणवीस यांनी केली आहे.
महामंडळासाठी तरतूद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्था (सारथी), अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ. वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योती) महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ या सर्व महामंडळांकरता निधी उपलब्ध करून देणार अशी घोषणाही फडणवीस यांनी केली आहे.
शेती विकासावर तरतूद : अर्थसंकल्पात कांदा उत्पादकांना मदत केली जाईल. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आली. यात केंद्राच्या प्रतिवर्ष प्रतिशेतकरी ६ हजार रुपयांत राज्य सरकार अजून ६ हजारांची भर घालणार आहे. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत. याचा लाभ १,१५,००० शेतकऱ्यांना होणार आहे. त्यासाठी ६,९०० कोटींची तरतूद केली जाणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली.
महाकृषीविकास अभियान योजना : यामध्येच (२०१६)च्या पंतप्रधान विमा निधी योजनेतील शेतकऱ्याच्या हिस्स्याचा विमा हफ्ता राज्य सरकार भरणर आहे. शेतकऱ्याला फक्त १ रुपये भरूप पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. तसेच, वार्षिक ३ हजार कोटींची तरतूद केली जाणार आहे. नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्याला ५० हजार रुपयांपर्यंतचा लाभ दिला जाणार आहे. १२ हजाराहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट रक्कम देण्यात आली आहे. महाकृषीविकास अभियान योजनेचीही यावेळी घोषणा करण्यात आली आहे. पाच वर्षांत ३ हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील. मागेल त्याला शेततळे यानंतर मागेल त्याला फळबाग, मागेल त्याला हरितगृह, मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्र असे घटक उपलब्ध करून दिले जातील. यासाठी १ हजार कोटींची तरतूद केली जाणार आहे.
राज्यभरातील स्मारकांसाठी महत्त्वाच्या तरतूदी :
- स्व. रा. सू. गवई स्मारक, अमरावती : 25 कोटी रुपये
- विचारवंत कै. नरहर कुरुंदकर स्मारक, नांदेडसाठी निधी
- स्व. शिवाजीराव देशमुख स्मारक, कोकरुड (सांगली) : 20 कोटी रुपये
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाटेगाव (सांगली) स्मारक : 25 कोटी रुपये
- हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक : 351 कोटी रुपये
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदूमिल स्मारक : 349 कोटी रुपये दिले/आणखी 741 कोटी रुपये देणार
- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आणि वढूबुद्रूक स्मारकांसाठी निधी
- भिडेवाडा (पुणे) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक: 50 कोटी रुपये
महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांचा विकास :
- श्री क्षेत्र ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधीकरणासाठी 50 कोटी रुपये
- श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी 25 कोटी रुपये
- श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी देणार.
- श्री संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकास निधीसाठी 500 कोटी रुपये
- भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपये निधी देणार
- श्री संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपूर 6 कोटी रुपये रुपये निधी
- श्री संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे (पुणे) 25 कोटी रुपये निधी
- प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी
- गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी 25 कोटी रुपये निधी
हेही वाचा :Schools Uniforms Free : आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत; राज्य सरकारची मोठी घोषणा