महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Breaking News : कर्नाटकचा एक इंचही भाग महाराष्ट्राला दिला जाणार नाही; मुख्यमंत्री बोम्मई पुन्हा बरळले - winter session live updates

Maharashtra breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Dec 27, 2022, 6:47 AM IST

Updated : Dec 27, 2022, 8:36 PM IST

20:35 December 27

कर्नाटकचा एक इंचही भाग महाराष्ट्राला दिला जाणार नाही; मुख्यमंत्री बोम्मई पुन्हा बरळले

कर्नाटकचा एक इंचही भाग महाराष्ट्राला दिला जाणार नाही. कर्नाटक सरकार प्रत्येक भूभागाचे संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. राज्य पुनर्रचना कायदा 1956 च्या आधारे राज्ये संघटित. महाराष्ट्रातील राजकारणी अशा गोष्टी करत आहेत की त्यांचे प्रकरण कोर्टासमोर प्रलंबित असून, खूप कमकुवत आहे, अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी दिली.

19:56 December 27

सीमा प्रश्नी राज्यसरकारची कचखाऊ भूमिका योग्य नाही - अशोक चव्हाण

नागपूर - महाराष्ट्र नेहमीच एक भूमिका घेत आला आहे जी अत्यंत विनम्रपणे आणि अतिशय समजूतदारपणे घेतली जाते. परंतु हे ज्या पद्धतीने राज्यसरकार कचखाऊ भूमिका घेत आहे, ते आम्हाला आवडलेले नाही, असे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर बोलताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

19:52 December 27

महाराष्ट्राने केलेल्या ठरावाचा कर्नाटक काँग्रेस अध्यक्षांनी केला निषेध

बेळगाव - कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यासाठी ठराव करण्याची गरज नव्हती. निवडणुकांमुळे हे केले जात आहे. आपल्या लोकांचे संरक्षण कसे करायचे हे आपल्याला माहीत आहे. हे लोक मराठी बोलतात पण कर्नाटकात राहतात. त्यामुळे आम्ही या ठरावाचा निषेध करतो, असे मत कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी मांडले आहे.

19:45 December 27

कापड दुकानातून 1 कोटी 70 लाखांची रक्कम चोरणारे 4 चोरटे जेरबंद

जालना : येथील नाथानी कापड दुकानातून 1 कोटी 70 लाखांची रक्कम चोरणाऱ्या 4 चोरट्यांना जालना पोलिसांनी अटक केली आहे. काल शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीदरम्यान आरोपींनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील लंपास केला होता. त्यामुळे पोलिसांसमोर चोरट्यांना शोधण्याचे आव्हान होते. मात्र या प्रकरणाचा तांत्रीक पद्धतीने तपास करत पोलिसांनी अवघ्या काही तासांतच चोरट्यांना जेरबंद केले. कुणाल महाडीवाले, दुर्गेश ढोलके, रोहण नाईक, राजू नाईक अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

19:42 December 27

राज्यात एकूण 1308 वैद्यकीय संस्थांमध्ये झाले मॉक ड्रील

मुंबई - राज्यात शासकीय आणि खासगी मिळून 1308 वैद्यकीय संस्थांमध्ये आज मॉक ड्रील झाले. तसेच 44 आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी 703 प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. दोन आंतरराष्ट्रीय रुग्णांचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेमध्ये रवाना करण्यात आले आहेत. तसेच सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.

19:39 December 27

मित्तल इस्टेटमध्ये भीषण आग

मुंबई - अंधेरी भागातील मित्तल इस्टेटमध्ये भीषण आग लागली आहे. आगिची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेत आतापर्यंत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

19:34 December 27

नांदेडमध्ये कोविड समर्पित 12 रुग्णालयांमध्ये घेतली रंगीत तालीम

नांदेड - जगभर कोरोनाच्या नव्या लाटेसंदर्भात अधिक काळजी केली जात आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे नांदेड जिल्ह्यात त्यादृष्टिने जिल्हा प्रशासनातर्फे जय्यत तयारी केली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आरोग्य सेवा-सुविधांचा आढावा घेऊन ज्यांचे लसीकरण राहिलेले आहे त्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन त्यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत.

19:11 December 27

अजित पवारांचा पुरवणी मागण्यांवरून फडणवीसांवर निशाणा

नागपूर -महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर 52,000 कोटी रुपयांहून अधिक पुरवणी मागणी मांडल्यानंतर आर्थिक गैरशिस्तीचा कारभार केल्याचा आरोप केला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये एकही महिला मंत्री नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

19:06 December 27

प्रतिष्ठित व्यक्तींचा 'अपमान' प्रकरणी विधानपरषदेतून विरोधकांचा सभात्याग

मुंबई - राज्यपाल कोश्यारी, राज्यमंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर काही नेत्यांनी अलीकडच्या काळात केलेल्या कथित वादग्रस्त टिप्पण्यांवरून महाराष्ट्र विधान परिषदेत मंगळवारी गदारोळ झाला. शेवटी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.

18:39 December 27

निर्मला सीतारामन यांना उद्या एम्समधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना उद्या एम्समधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. पोटात किरकोळ संसर्ग झाल्याने काल त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्या बऱ्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

17:35 December 27

विधानपरिषदेतही सीमावादासंदर्भातील ठराव एकमताने मंजूर

नागपूर - कर्नाटकमधील 865 मराठी भाषिक गावांचा राज्यात समावेश करण्यासाठी कायदेशीरपणे पाठपुरावा करण्याचा ठराव महाराष्ट्र विधान परिषदेनेही एकमताने मंजूर केला. केंद्राने मराठी लोकांच्या सुरक्षेची हमी द्यावी, असा हा ठराव मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेल्या ठरावात सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेण्यात आली आहे.

17:08 December 27

मुंबईतील रुग्णालयांमध्ये मॉक ड्रील; ICU, ऑक्सिजन पुरवठा आणि मनुष्यबळ सज्जतेची तपासणी

मुंबई -चीन आणि इतर देशांमध्ये कोरोना विषाणूजन्य आजाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरी आणि सरकारी रुग्णालयांनी आज मॉक ड्रील घेतली. रुग्णालयांचे कोविड-19 वॉर्ड आणि रुग्णांसाठी उपलब्ध सुविधा तपासण्यासाठी ही मॉक ड्रील आयोजित केली होती. यावेळी सर्व व्यवस्था चोख आहेत का याचा आढावा घेण्यात आला असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

17:04 December 27

डिजीटल स्क्रिनवर आक्षेपार्ह संदेश प्रदर्शित, हॅकर्स विरोधात गुन्हा दाखल

मुंबई - दिंडोशी परिसरात डिजिटल वाहतूक सल्लागार मंडळाच्या डिजीटल स्क्रिनवर आक्षेपार्ह संदेश प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर अज्ञात हॅकर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. शहर नागरी संस्थेने गोरेगाव (पूर्व) उपनगरातील एका मॉलजवळ स्मार्ट ट्रॅफिक पोल बसवले होते. एका कंत्राटदाराने एका खांबावर वाहतुकीशी संबंधित सूचना प्रदर्शित करण्यासाठी दोन एलईडी स्क्रीन बोर्ड लावले होते. त्यावर आक्षेपार्ह संदेश झळकला होता.

15:25 December 27

आव्हान दिल्यानंतर कुणाच्याही बापाचे ऐकत नाही - अजित पवार

नागपूर - अजित पवार यानी बारामतीवर नजर ठेवणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. बारामती देऊन घड्याळ बंद करण्याचा आणि करेक्ट कार्यक्रम करण्याचा वल्गना काही नेते करत आहेत. मात्र मी मनात आणले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करीन, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. मला कोणीही आव्हान देऊ नका, आव्हान दिल्यानंतर मी कुणाच्याही बापाचे ऐकत नाही असा टोला अजित पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना लगावला आहे.

15:11 December 27

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाच्या गाडीला म्हैसूरजवळ अपघात

म्हैसूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाच्या गाडीला म्हैसूरजवळ अपघात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद दामोदरदास मोदी प्रवास करत असलेल्या बेंझ कारला म्हैसूरमध्ये अपघात झाला. बांदीपूरकडे जात असताना कडकोलाजवळ रस्ता दुभाजकाला धडकून हा अपघात झाल्याची माहिती आहे. कारमधून मोदींचे भाऊ, त्यांचा मुलगा, सून आणि नातू प्रवास करत होते. जखमींना जेएसएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोदींच्या भावाच्या हनुवटीवर मार लागला आहे. सुनेच्या डोक्याला दुखापत झाली आहे. नातवाच्या पायाला दुखापत झाली आहे. मुलगा आणि चालक सत्यनारायण यांनाही किरकोळ दुखापत झाल्याचे वृत्त आहे.

14:40 December 27

देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयला मुदत देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

13:56 December 27

नाकाद्वारे कोविड लसीची किंमत खासगीसाठी 800 तर सरकारी रुग्णालयांसाठी 325 रुपये

नवी दिल्ली - केंद्रसरकारने मंगळवारी भारत बायोटेकच्या नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या कोविड-19 लस iNCOVACC ची किंमत निश्चित केली. ही लस 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी बूस्टर डोस म्हणून वापरली जाईल. या लसीची किंमत खासगी रुग्णालयांसाठी 800 रुपये आणि सरकारी रुग्णालयांसाठी 325 रुपये असेल.

12:47 December 27

दुपारी विधानसभेत सीमा वादावर ठराव मांडणार - देवेंद्र फडणवीस

नागपूर - आज दुपारी विधानसभेत सीमा वादावर ठराव मांडण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. सीमा वादाच्या ठरावाला आमचा पाठिंबा आहेच असे अजित पवार यांनी सांगितले. त्याचवेळी तो लवकरात लवकर मांडला जावा ही आमची भावना आहे असे ते म्हणाले. ठरावाच्या मसुद्यामध्ये काही व्याकरणाच्या चुका असतील तर त्या सुधारून घेतल्या जातील. सीमा वादाच्या ठरावावर चर्चा व्हावी अशी मागणी अशोक चव्हाण यांनी विधानसभेत केली. सर्वोच्च न्यायालयात हा लढा सुरू आहे. कोणताही लढा एवढा काळ चालला नाही. सर्वोच्च न्यायालयात निकाल लागत नाही तोपर्यंत हा प्रदेश केंद्रशासित करावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केली.

12:45 December 27

देशमुखांच्या जामीनावर स्थगितीसाठी सीबीआय पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात

मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामीनावर स्थगितीसाठी सीबीआयची पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव. सुट्टीकालीन कोर्टात थोड्याच वेळात होणार तातडीची सुनावणी. देशमुखांच्या जामीनाला दिलेली स्थगिती पुन्हा एकदा वाढवून मागण्याकरता सीबीआयची याचिका. काही वेळात होणार सुनावणी.

11:53 December 27

स्टंटबाज रशियन यूट्यूबर्स पोलिसांच्या ताब्यात

मुंबई - स्टंट करण्यासाठी जाणाऱ्या दोन रशियन यूट्यूबर्सना ताडदेव पोलिसांनी पकडले आहे. हे दोन्ही रशियन युट्यूबर जीवघेणे स्टंट करण्यासाठी ट्विन टॉवर इमारतीत गेले होते. ही बाब इमारतीमधील सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास येताच त्यांनी ताडदेव पोलिसांना याची माहिती दिली आणि त्यांना पकडले. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

11:50 December 27

कोचर दांपत्याला उच्च न्यायालयाचा दिलासा नाही

कोचर दांपत्याला उच्च न्यायालयाचा दिलासा नाही. आयसीआयसीआय बँक लोन घोटाळा प्रकरणी चंदा आणि दीपक कोचर यांना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार. सीबीआयने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली होती. सीबीआयने दाखल केलेला एफआयआर रद्द करत सुटकेती मागणी त्यांनी केली होती. त्यावर 2 जानेवारीला नियमित कोर्टात दाद मागण्याचे कोचर यांना निर्देश देण्यात आले.

11:47 December 27

अनिल देशमुख यांच्या सुटकेची शक्यता, आज जामिन स्थगितीची मुदत संपणार

मुंबई -राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता कमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जामीनाला दिलेली वाढीव स्थगितीची मुदत आज संपणार आहे. आज दिवसभरात सुनावणी झाली नाही तर अनिल देशमुखांच्या सुटेकचा मार्ग मोकळा होईल. मुंबई उच्च न्यायालयातर्फे 12 डिसेंबरला देशमुख यांना दिलेला जामीन आदेश लागू होणार आहे. देशमुख यांच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे.

11:20 December 27

टाळच्या आवाजाने विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला

आज अधिवेशनाचा सातवा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईडी सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. विधानपरिषदेच्या आवारातून ही दिंडी विधानसभेच्या पायर्‍यांवर काढण्यात आली. टाळच्या आवाजाने विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

10:13 December 27

शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळच्या सत्रात 317.49 अंकांची वाढ

मंगळवारी सकाळी शेअर बाजाराचा निर्देशांक 317.49 अंकांनी वधारून 60,883.91 वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक 106.50 अंकांनी वाढून 18,121.50 वर पोहोचला.

10:08 December 27

उद्धव ठाकरे त्यांना हवे ते मागणी करू शकतात पण...दीपक केसरकर

आम्ही एक मजबूत ठराव आणू जो राज्यातील लोकांच्या बाजूने उभा राहील. उद्धव ठाकरे त्यांना हवे ते मागणी करू शकतात पण त्यावरही मुख्यमंत्री शिंदे उत्तर देतील, असे राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

10:07 December 27

देशभरातील सर्व कोविड रुग्णालयांमध्ये आज मॉक ड्रील

कोविड मॉक ड्रिलचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सफदरजंग हॉस्पिटलला भेट दिली. देशभरातील सर्व कोविड रुग्णालयांमध्ये आज मॉक ड्रील घेण्यात येत आहेत.

09:30 December 27

मंत्र्यांवरील घोटाळ्याची माहिती घेऊन भूमिका स्पष्ट करणार-अजित पवार

महाविकास आघाडीची आज दहा वाजता बैठक होणार आहे. महाराष्ट्र सीमावासियांच्या पाठिशी असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. हायकोर्टाचे मंत्र्यांवर ताशेरे असल्याचेही विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे. मंत्र्यांवरील घोटाळ्याची माहिती घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहे.

09:09 December 27

दोन रशियन यूट्यूबर्सवर गुन्हा दाखल

मुंबई पोलिसांनी दोन रशियन यूट्यूबर्सवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी स्टंट व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी काल तारदेव परिसरातील इम्पीरियल ट्विन टॉवर्समध्ये प्रवेश केला होता. आयपीसीच्या कलम ४५२ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

08:44 December 27

सीमाप्रश्नावर आज मुख्यमंत्री ठराव मांडणार - देवेंद्र फडणवीस

अडीच वर्षे काहीच केले नाही का, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला. ते माध्यमांशी बोलत होते. सीमाप्रश्नावर आज मुख्यमंत्री ठराव मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

07:07 December 27

सलमान खानचा 57 वा वाढदिवस, फोटोग्राफरसोबत कापला केक

मुंबई बॉलीवूडचा मेगास्टार सलमान खान उर्फ 'भाईजान' याने ( Salman Khan birthday celebrations ) मंगळवारी रात्री त्याच्या 57 व्या वाढदिवसानिमित्त खास सेलिब्रेशन केले. खान कुटुंबाने अर्पिता खान शर्माच्या मुंबईतील निवासस्थानी एका पार्टीचे आयोजन केले होते. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. त्याचबरोबर सलमानने फोटोग्राफरसोबत वाढदिवसाचा केक कापला.

06:33 December 27

Breaking : भारतीय तटरक्षक दलाने पकडली पाकिस्तानी बोट; सापडला शस्त्रास्त्र, दारूगोळा, अंमली पदार्थांचा साठा

मुंबई : भारतीय तटरक्षक दलाने (ICG) गुजरात दहशतवादविरोधी पथकासोबत केलेल्या संयुक्त कारवाईत मोठे यश मिळविले आहे. तटरक्षक दलाने शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि 300 कोटी रुपये किमतीचे सुमारे 40 किलो अमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या 10 कर्मचाऱ्यांसह पाकिस्तानी बोट सोमवारी पकडली.

Last Updated : Dec 27, 2022, 8:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details