सातारा - साताऱ्याकडून मुंबईकडे कात्रज नवीन बोगद्यातून जाणारी वाहतूक व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी शनिवारी (दि. १८) आणि बुधवारी (दि. २३) रात्री ११ ते २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत या मार्गावरील वाहतूक जुना कात्रज बोगदा मार्ग कात्रज चौक, नवले पुल, विश्वास हॉटेलपासून सेवा रस्त्यावरुन मुंबईकडे वळविण्यात येणार आहे. मुंबईकडून सातान्याकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणेच सुरू राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली आहे.
Breaking News : कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक शनिवार, बुधवारी सहा तास राहणार बंद - महाराष्ट्र अर्थसंकल्प अधिवेशन
22:55 March 17
कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक शनिवार, बुधवारी सहा तास राहणार बंद
21:43 March 17
शेतकरी आंदोलन मागे घेण्यावर लवकरच निर्णय - शेतकरी नेते
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेसमोर आपले म्हणणे मांडले आहे. त्याची प्रत अद्याप आम्हाला मिळालेली नाही. आम्हाला ते मिळाल्यावर ते आमच्या लोकांना दाखवू आणि चर्चा करू, त्यानंतर आंदोलन सुरू ठेवायचे की परत जायचे हे आम्ही ठरवू, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते जेपी गावित यांनी दिली.
19:56 March 17
गावित यांना आंदोलन मागे घेण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती
मुंबई - शेतकरी-कामगारांच्या प्रश्नावर जेपी गावित यांच्या नेतृत्वाखाली लाँग मार्च काढण्यात आला. त्यांच्याशी बोलल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच 14-15 मुद्दे होते आणि त्यातील काहींवर निर्णय घेण्यात आले, अशी माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. निर्णयांची अंमलबजावणीही केली जाईल, असेही ते म्हणाले. गावित आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.
19:29 March 17
सीमाप्रश्न : महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याची केंद्राकडे मागणी - सिद्धरामय्या
बंगळुरू - महाराष्ट्र सरकार कर्नाटकातील गावांना विविध सुविधा पुरवत आहेत. हा प्रकार म्हणजे कर्नाटकमध्ये महाराष्ट्र सरकार अंतर्गत कारभारात विनाकारण हस्तक्षेप करत आहे, असा आरोप कर्नाटकचे काँग्रस नेते सिद्धरामय्या यांनी केला आहे. म्हणूनच आम्ही केंद्रसरकारकडे कर्नाटकातील 865 गावांमध्ये महाराष्ट्राची आरोग्य योजना अंमलबजावणी थांबवण्यासाठी तत्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. तसेच आम्ही केंद्रसरकारकडे महाराष्ट्र सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे, असेही ते म्हणाले.
19:09 March 17
रिलायन्स फाऊंडेशन दृष्टी उपक्रमांतर्गत मराठी भाषेत ब्रेल वृत्तपत्र सुरू
मुंबई - 'रिलायन्स फाऊंडेशन दृष्टी' या उपक्रमांतर्गत मराठी भाषेत ब्रेल वृत्तपत्र सुरू करून मैलाचा दगड म्हणून दोन दशके सेवा नुकतीच पूर्ण केली. दृष्टी उपक्रमांतर्गत विविध २०,५०० हून अधिक मोफत कॉर्नियल प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आले आहे. तसेच १.७५ लाखांहून अधिक लोकांना सेवा प्रदान करण्यात आली आहे.
19:02 March 17
राहुल गांधींनी माफी मागावी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही - शशी थरुर
नवी दिल्ली - राहुल गांधी त्यांनी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याने टीकेचे धनी होत आहेत. भाजपने भारतातील लोकशाहीवर लंडनमध्ये केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. त्यावर खासदार शशी थरूर म्हणाले की त्यांनी परदेशात असे कोणतेही वक्तव्य केले नाही की ज्याबद्दल त्यांनी माफी मागावी. त्यांनी माफी मागावी असे काहीही ते बोलले नाही, त्यामुळे ही मागणी मूर्खपणाची अहे असे ते म्हणाले.
18:30 March 17
भारताची हाराकिरी सुरू, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात 4 बाद फक्त 58 धावा
मुंबई - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा खेळ सुरू झाल्यानंतर खेळाडूंची अक्षरशः हाराकिरी सुरू असल्याचे दिसत आहे. भारताचे एकामागून एक चार गडी तंबूत परतले आहेत. त्यामध्ये ईशान, विराट, सूर्यकुमार यांच्यासह शुभमन गिलचीही विकेट गेली आहे. भारत सध्या 4 बाद 58 धावांवर खेळत आहे. पंधरा षटकात भारताचा जवळ-जवळ निम्मा संघ तंबूत परतला आहे.
17:33 March 17
एका वकिलावरील हल्ल्याचा मुंबई सेशन कोर्टात वकिलांनी केला निषेध
मुंबई - वकील पृथ्वीराज झाला यांच्यावरील हल्ल्याचा मुंबई सेशन कोर्टात वकिलांनी निषेध केला. तीनशे वकील एकत्र येऊन वकिलावरील होणाऱ्या हल्ल्याचा निषेध केला.
17:04 March 17
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतापुढे विजयासाठी 189 धावांचे लक्ष्य
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 188 धावा केल्या आहेत. भारतापुढे विजयासाठी 189 धावांचे लक्ष्य आहे. सध्या ब्रेक झाला असून अजून खेळ सुरू व्हायचा आहे.
16:20 March 17
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या ईडी कोठडीत 5 दिवसांची वाढ
नवी दिल्ली - दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरणाची रचना आणि अंमलबजावणीमध्ये कथित अनियमितता संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या कोर्टाने माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची ईडी कोठडी आणखी पाच दिवसांनी वाढवली आहे.
15:54 March 17
अमृता फडणवीस यांना फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानियाला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई - देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानियाला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. काल तिला अटक करण्यात आली होती.
15:42 March 17
अकोल्यात मृत्यू झालेल्या बालकाचा एच-३ एन-२ अहवाल आला पॉझिटिव्ह
अकोला - येथील बालरुग्णालयात दाखल असलेल्या 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्याचा अहवाल काल मिळाला. तो 'एच-३ एन-२' पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती आज मिळाली आहे. स्वाईन फ्लूचा प्रकार असलेल्या या आजाराने अकोल्यातही एंट्री केल्याचे स्पष्ट झाले आहे. सात वर्षीय मुलाचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक बाब गुरुवारी समोर आली आहे. या आजाराचा फैलाव होण्याचा वेग मोठ्या प्रमाणात असून लहान मुले, वृद्ध आणि दुर्धर आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
15:23 March 17
जतमध्ये नगरसेवक विजय ताड यांची हत्या
सांगली - जतमध्ये नगरसेवक विजय ताड यांची हत्या करण्यात आली आहे. ते आपल्या मुलीला शाळेत आणण्यासाठी गाडीतून जात होते. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवली. त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांचा या गोळीबारात जागीच मृत्यू झाला.
15:07 March 17
आठवीच्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल
ठाणे - एका 14 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी एका खासगी शाळेतील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी आज दिली. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 323 आणि बाल न्याय कायदा आणि शिक्षण हक्क कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे, असे वाशिंद पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक घनश्याम आढाव यांनी सांगितले.
14:55 March 17
पालघरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षकाला अटक
पालघर - जिल्ह्यातील एका किशोरवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका शाळेच्या 41 वर्षीय शिक्षकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज दिली. नाला सोपारा येथील आरोपीला गुरुवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या संबंधित कलमे लावण्यात आली आहेत.
14:48 March 17
लालबाग हत्याकांड प्रकरणी अमजद अलीला उत्तर प्रदेशातून घेतले ताब्यात
मुंबई - लालबाग हत्याकांड प्रकरणी अमजद अली याला काळाचौकी पोलिसांनी चौकशीसाठी उत्तर प्रदेशातून घेतले ताब्यात.
14:44 March 17
ठाण्यातून सात वर्षे फरार खुनातील आरोपीला उत्तर प्रदेशातून पकडले
ठाणे - जिल्ह्यातील तीन जणांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या 41 वर्षीय व्यक्तीला उत्तर प्रदेशातील एका गावातून अटक केली आहे. तो सात वर्षांपासून फरार होता, अशी माहिती पोलिसांनी आज दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, काशिमीरा पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे 13 मार्च रोजी उत्तर प्रदेशातील एका गावातून आरोपीला अटक केली. आरोपींनी जुलै 2016 मध्ये पूर्वीच्या वैमनस्यातून तीन जणांची हत्या केली होती आणि तेव्हापासून ते फरार होते, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक अविराज कुऱ्हाडे यांनी दिली.
14:34 March 17
बेल्जियमचे नागरिकत्व, मात्र भारतीय पासपोर्ट वापरणाऱ्याला हायकोर्टाची चपराक
मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने बेल्जियमचे नागरिकत्व मिळविलेल्या परंतु भारतीय पासपोर्टचा वापर इतर राष्ट्रांमध्ये प्रवास करण्यासाठी केलेल्या एका व्यक्तीला भारतात प्रवेश बंदी घालण्याचा केंद्राचा निर्णय कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने 14 मार्चच्या आदेशात यासंदर्भात केंद्राच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या विक्रम शहा याला दिलासा देण्यास नकार दिला.
14:06 March 17
आणखी एक घोटाळा बाहेर काढणार - आदित्य ठाकरे
मुंबई - आ. आदित्य ठाकरे म्हणाले की, ६ हजार ८० कोटींचा घोटाळा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. अजून एक घोटाळा बाहेर आणत आहे. कारण दोन दिवसात वर्क ऑर्डर निघणार आहे. महानगर पालिकेवर बसलेले प्रशासक हुकूमशहा प्रमाणे वागत आहेत. १९ सॅनिटरी नॅपकीन मशीन घोटाळा बाहेर काढला आहे. त्यावर उत्तर मिळालेले नाही, असेही ते म्हणाले.
12:54 March 17
सोलापुरात जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे मुंडन आंदोलन
सोलापूर - जुन्या पेन्शनसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी मुंडन करत शासनाचा निषेध केला आहे.
12:45 March 17
राज्यसरकार संपकऱ्यांना नोटीस बजवणार
मुंबई - संपकऱ्यांना नोटीस बजवण्यात येणार आहे, सरकारने ही बाब हायकोर्टात स्पष्ट केली आहे. जनतेला कोणताही त्रास होऊ नये अशी याचिकेत मागणी केली आहे. 23 मार्च रोजी पुन्हा याची होणार सुनावणी. सरकारी पक्षाच्या वतीने संप बेकायदेशीर असल्याचे म्हणणे मांडले. राज्यतील महिला व बालक पोषण आणि शिक्षण ह्यापासून वंचित राहू नये याची दक्षता शासनाने घ्यावी असे निरीक्षण उच्च न्यायालयाने मांडले.
12:22 March 17
हवामानात बदल होत आहे, काळजी घ्या - आरोग्य मंत्री सावंत
मुंबई - हवामानात बदल होत असून, त्याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिला आहे. ते म्हणाले की, गर्दीच्या ठिकाणी जाणे कमी करा, मास्क वापरा, हात धुवा आणि अंतर राखा. ताप असेल तरच डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे मंत्री तानाजी सावंत म्हणाले.
12:14 March 17
मैत्र विधेयक विधानपरिषदेत मागे का घेतले - बाळासाहेब थोरात
मुंबई - बाळासाहेब थोरात यांनी मैत्र विधेयकाबाबत उपस्थित केला मुद्दा. विधानसभेत मंजूर केलेले मैत्र विधेयक विधानपरिषदेत घेतले मागे. चांगला हेतू ठेवून आलेले विधेयक मागे का घेतले हे सरकारने स्पष्ट केले नाही. याबाबत विधानसभेत माहिती देणे अपेक्षित होते ती दिली नाही.
12:02 March 17
छ. संभाजीनगर - पंतप्रधान अवास योजनेतील घोटाळा प्रकरणी ईडीची छापेमारी
छत्रपती संभाजीनगर - पंतप्रधान अवास योजनेतील घोटाळा प्रकरणी ईडीची छापेमारी. छत्रपती संभाजी नगरात तीन ठिकाणी छापेमारी सुरू असल्याची माहिती. पंतप्रधान अवास योजनेच्या घोटाळ्याची ईडीकडून सुरू होती चौकशी. चौकशीनंतर ईडीची छापेमारी सुरू असल्याची माहिती.
11:58 March 17
गर्लफ्रेंडने धोका दिल्याने काँग्रेसच्या शहराध्यक्षाची आत्महत्या
गर्लफ्रेंडने धोका दिल्याने काँग्रेसच्या शहराध्यक्षाची आत्महत्या केली आहे. व्हाट्सअप आणि इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवून गजानन गुरव यांनी संपवली जीवन यात्रा.. अपनी रानी किसी की दीवानी हो गई" म्हणत गजानन यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
11:48 March 17
आशा सेविकांना मानधन वाढ करा - वर्षा गायकवाड
मुंबई - आशा सेविकांना मानधन वाढ करा. दिवाळी भाऊबीज म्हणून अशा सेविकांना मदत करावी अशी मागणी आमदार वर्षा गायकवाड यांनी विधिमंडळात केली. बाळासाहेब थोरात म्हणाले की, अशा वर्कर ऐवजी आशा भगिनी हा शब्द वापरावा. या महिलांचा सन्मान होणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
11:42 March 17
छत्रपती संभाजीनगरमध्ये ईडीचे छापे, कोण लागणार गळाला?
छत्रपती संभाजीनगरमध्ये ईडीने ९ ठिकाणी छापे टाकले आहेत. हे छापे पंतप्रधान आवास योजनेसंदर्भात असल्याची चर्चा आहे. छापे हे डॉक्टर व अभियंत्यांच्या मालमत्तांवर पडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
11:41 March 17
किसान लाँग मार्चकडून सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेट
किसान लाँग मार्च तात्पुरता स्थिगत करण्यात आला आहे. किसान लाँग मार्चने सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेट दिला आहे.
11:40 March 17
संसदेत गोंधळ, दोन्ही सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मागण्याच्या विषयावरून संसदेत गोंधळ झाला आहे. दोन्ही सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
10:23 March 17
तेलंगणाच्या इतिहासात भाजपने पहिल्यांदाच जिंकली शिक्षक मतदारसंघाची जागा
तेलंगणाच्या इतिहासात भाजपने शिक्षक मतदारसंघात एमएलसीची जागा जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही निवडणूक बीआरएसच्या विरोधात, विशेषत: सरकारी कर्मचारी आणि सुशिक्षित वर्गातील मजबूत विरोधी पक्ष सिद्ध करते. या निवडणुकीने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा मूड सेट केला आहे, असे तेलंगणा भाजपचे अध्यक्ष बंदी यांनी म्हटले आहे.
10:23 March 17
जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही, यामुळेच तुमचा पक्ष संपुष्टात आला-जेपी नड्डा यांची राहुल गांधींवर टीका
राहुल गांधी जी, भारत ही लोकशाहीची जननी आहे. जगातील कोणतीही शक्ती भारताच्या लोकशाही वारशाचे नुकसान करू शकत नाही. आज देशात तुमच्या पक्षाचे कोणी ऐकत नाही. जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही. यामुळेच तुमचा पक्ष जवळपास संपुष्टात आल्याची टीका भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली आहे.
10:19 March 17
गृहमंत्र्यांच्या घरापर्यंत ब्लॅकमेलिंग वाढले-संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात
पूर्वीचे देवेंद्र फडणवीस राहिले नाहीत. कायदा व सुव्यवस्थेचा रोज मुडदा पडत आहे. गृहमंत्र्यांच्या घरापर्यंत ब्लॅकमेलिंग वाढले आहे. भाजपप्रमाणे कुटुंबात घुसण्याची आम्हाला सवय नाही, असा टोलाही खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
10:07 March 17
छत्रपती संभाजीनगर शहरातील सोनेरी महालाला मिळाले नवीन आकर्षक स्वरुप
छत्रपती संभाजीनगर शहरातील सतराव्या शतकातील ‘सोनेरी महाल’ या राजवाड्याला अधिक उजळ आणि आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. राज्य पुरातत्व विभागाने हेरिटेज वास्तू उजळून टाकण्यासाठी दिवे बसवले आहेत. शाहजहानच्या राजवटीत मुघलांची सेवा करताना बुंदेल राजा पहाडसिंग याने हे स्मारक बांधले होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
10:05 March 17
महिला प्रवाशांना आजपासून सर्व प्रकारच्या बसच्या तिकिटांवर 50 टक्के सवलत मिळणार
महिला प्रवाशांना आजपासून सर्व प्रकारच्या बसच्या तिकिटांवर 50 टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे प्रवास करताना महिलांची मोठी आर्थिक बचत होणार आहे.
10:03 March 17
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर थांबलेल्या ट्रकला कारची धडक, तीन ठार
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी सकाळी एका थांबलेल्या ट्रकला धडकून तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
09:53 March 17
अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणात अनिक्षा जयसिंघनियाला आज न्यायालयात करण्यात येणार हजर
उपमुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस यांना फसवणाऱ्या अनिक्षा जयसिंघनिया हिला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अमृता फडणवीस यांना तब्बल एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा तिच्यावर आरोप आहे.
09:49 March 17
H3N2 आणि कोरोनाचा आकडा पुढील आठवड्यात कमी झालेला दिसेल-आरोग्यमंत्री तानाजी सावंत
H3N2 आणि कोविड १९ याबाबत यंत्रणा सजग झाली आहे. काल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि अधिकारी अशी आमची बैठक झाली. आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. हवामानातील बदलाचे परिणाम प्रामुख्याने पहायला मिळाले. ताप, कणकण अंगावर न काढता ४८ तासाच्या आत डाॅक्टरांशी सल्लामसलत करणे. डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देऊ नये असेही सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना आवाहन करतो घाबरून जाऊ नये. ज्या पद्धतीने हा आकडा वाढलेला दिसतोय तो पुढील आठवड्यात कमी ही झालेला दिसेल.
09:16 March 17
बिबट्याने अंगणातील शेतकऱ्याच्या कुत्र्याला केले ठार
हिंजवडी आयटी पार्कजवळील नेरे गावात बिबट्याने शेतकऱ्याच्या कुत्र्याला ठार करून पळवून नेले. ही घटना १५ मार्च रोजी घडली आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
08:21 March 17
कोल्ड स्टोरेजचे छत कोसळून ८ जण ठार, एनडीआरएफचे बचावकार्य सुरू
उत्तरप्रदेश जिल्ह्यातील चांदौसी भागात गुरुवारी झालेल्या कोल्ड स्टोरेजच्या दुर्घटनेत आतापर्यंत ८ मजुरांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी इस्लाम नगर रोडवरील कोल्ड स्टोरेज चेंबरचे छत अचानक कोसळले. त्यामुळे 50 हून अधिक मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर एनडीआरएफचे बचावकार्य सुरू आहे.
07:52 March 17
सिकंदराबादमधील कंपनीच्या भीषण आगीत सहा बीपीओ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
सिकंदराबाद स्वप्नलोक बहुमजली संकुलात भीषण आगीत सहा बीपीओ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हे कर्मचारी कॉल सेंटर कंपनीच्या आवारात बेशुद्ध अवस्थेत सापडले होते.
07:43 March 17
जुन्या पेन्शनच्या मागणीवर राज्य सरकारचे कर्मचारी ठाम, संपाचा आज चौथा दिवस
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवशेन सुरू असताना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. जुन्या पेन्शनसाठी मागणी लावून धरल्याने सरकारची कोंडी होत आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये कर्मचारी व डॉक्टर नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
07:12 March 17
अंमलबजावणी झाली नाही तर थांबलेला लाँग मार्च मुंबईच्या दिशेने निघेल-शेतकरी नेते जे. पी. गावित यांचा इशारा
आम्ही सरकारपुढे 12-13 मागण्या ठेवल्या आहेत. त्या सर्वांवर चर्चा केली आहे. पण सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करायची आहे. यावेळी अंमलबजावणी झाली नाही तर थांबलेला लाँग मार्च मुंबईच्या दिशेने निघेल, अशा इशारा शेतकरी नेते जे.पी.गावित यांनी दिला आहे.
07:11 March 17
अडीच महिन्यांत राज्यात H3N2 चे 19 तर H1N1 चे 324 आढळले रुग्ण
1 जानेवारी ते 15 मार्च या कालावधीत महाराष्ट्रात H3N2 चे 19 आणि H1N1 चे 324 प्रकरणे नोंदवली गेली. H1N1 संसर्गामुळे तीन मृत्यूची नोंद झाली आहे, तर H3N2 संसर्गामुळे एक मृत्यू झाल्याचे महाराष्ट्र आरोग्य विभागाने म्हटले आहे.
07:09 March 17
बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला काँग्रेसचा विरोध
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून 18-19 मार्च रोजी मुंबईत बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी विनंती केली. महाराष्ट्र हे एक पुरोगामी राज्य आहे आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तीला राज्यात स्थान नसल्याचे स्थान नाही.
07:09 March 17
चार जणांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू, तीन आरोपींना अटक
मुंबईतील चारकोप पीएस परिसरात एका व्यक्तीला चार जणांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर काल उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आयपीसीच्या 302 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आणि 3 आरोपींना अटक केली, एक आरोपी फरार आहे. तपास सुरू असल्याचे मुंबई पोलीस उपायुक्त अजय बन्सल यांनी सांगितले.
06:36 March 17
Maharashtra Breaking News : शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात मुख्यमंत्री आज विधिमंडळात निवेदन करणार
मुंबई :शेतकरी आणि आदिवासींनी आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून काढलेल्या लॉंग मार्च थांबविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केले. तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकी संदर्भात विधिमंडळात निवेदन करणार असल्याची माहितीही त्यांनी शिष्टमंडळाला दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा लाँग मार्च थांबणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.