मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार स्थापन होण्याच्या अंतिम टप्प्यात असताना भाजपने जोरदार हालचाली करत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. यानंतर काही वेळाने महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक ट्विट करण्यात आले. त्याची आता चांगलीच चर्चा होत आहे.
हेही वाचा - मोठ्या फरकाने बहुमत सिद्ध करु, राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास
'अजून कोणालाही दिलेल्या शब्दापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला शब्द मोठा! शब्द राखला, तो पुन्हा आला', असे ट्विट करून त्याखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो जोडलेले ट्विट करण्यात आले आहे. यातील 'अजून कोणाला' म्हणजे शिवसेनेला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा - Live - राज्यपालांच्या निर्णयाविरोधातील आव्हान याचिकेवर आज सुनावणी
शनिवारच्या घडामोडींनंतर भाजपकडून करण्यात आलेल्या या ट्विटमुळे उलटसुलट चर्चा सुरू असून, अजून कोणालाही दिलेल्या शब्दापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला शब्द मोठा, असे भाजप म्हणत असल्याने त्यांनी शिवसेनेला मुख्यमंत्री पदाविषयी शब्द दिला होता का? असाही प्रश्न साहजिकच उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री पदाचा कोणताही शब्द आम्ही दिला नव्हता, असे भाजपचे जवळपास सर्वच नेते सांगत असले तरी या ट्विटवरून भाजपने असा शब्द दिला असल्याचे त्यावरून दिसत आहे.