मुंबई - अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचेच कर्जमाफ करू, असे सांगितले. मात्र, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द पाळला नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी सरकारवर केली.
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द सरकारने पाळला नाही - चंद्रकांत पाटील - चंद्रकांत पाटीलांची टीका
आज महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असताना ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे कर्जमाफ करू, असे सांगून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले.
हेही वाचा -थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार... पाहा, काय म्हणाले जयंत पाटील
सांगली, कोल्हापूरमधील महापूर आणि राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत करू, असे उद्धवजींनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले होते. मात्र, त्या शेतकऱ्यांना एकही रुपयांची मदत केली नाही, असेही त्यांनी ट्विट करून म्हटले आहे.
दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. याद्वारे शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ होणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी १५ दिवसात योजना जाहीर केली जाईल, असे सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.