महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंकजा मुंडे केंद्रात जाण्यास उत्सुक नसल्याचे चित्र, समर्थक ही नाराज

भाजपने नवी कार्यकारणी जाहीर केली आहे. यात पंकजा मुंडे यांची विशेष निमंत्रित म्हणून बोळवण करण्यात आली आहे. दरम्यान, नव्या पक्ष कार्यकारिणीचे पंकजा यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या बद्दल पक्षाने भूमिका जाहीर केली, याबाबत त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आहेत. या ट्विट मधूनच पंकजा यांच्या नाराजीचा सूर स्पष्ट दिसून येत आहे.

Maharashtra bjp leader pankaja munde to get national level position in party organisation
पंकजा मुंडे केंद्रात जाण्यास उत्सुक नसल्याचे चित्र, समर्थक ही नाराज

By

Published : Jul 4, 2020, 12:43 AM IST

मुंबई- भाजपच्या नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या पराभवानंतर पक्षाच्या कारभारावर बोट ठेवत नाराजी व्यक्त केली होती. आता पंकजा यांना केंद्रात, पक्ष संघटनेत काम करण्याची संधी दिली जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. मात्र पंकजा मुंडे सध्या केंद्रात जाण्यास उत्सुक नसल्याचे चित्र आहे. भाजपने नवी कार्यकारणी जाहीर केली आहे. या नव्या पक्ष कार्यकारिणीचे पंकजा यांनी ट्विट करून अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या बद्दल पक्षाने भूमिका जाहीर केली, याबाबत त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आहेत. या ट्विट मधूनच पंकजा यांच्या नाराजीचा सूर स्पष्ट दिसून येत आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पंकजा यांनी केंद्रात काम करावे, ही पक्षाची इच्छा असल्याचे म्हटले आहे. मात्र याबाबत अद्याप पंकजा यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. प्रदेश कार्यकारिणीत पंकजा, एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांना संधी देण्यात आलेली नाही. त्यांची विशेष निमंत्रित म्हणून बोळवण करण्यात आली आहे. केवळ चंद्रशेखर बावनकुळे यांना कार्यकारिणीत महामंत्री करण्यात आले आहे.

पंकजा मुंडे यांनी केलेले ट्विट...
सत्तेतून पायउतार झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत धुसफूस बाहेर आली होती. पक्षात नाराज असलेल्या एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांची नाराजी दूर करत त्यांचे कसे पुनर्वसन करणार? याबाबत पक्ष कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा होती. या तिन्ही नेत्यांची तिकिटे विधानसभा निवडणुकीत कापण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत, परिषदेवर त्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. मात्र पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देऊन या नेत्यांना डावलले होते. पंकजा मुंडे यांनाही परिषदेवर संधी दिली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. या पार्श्वभूमीवर नव्या बदलांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी नवी कार्यकारिणी जाहीर केली. यात तावडे, बावनकुळे, मेहता यांना निमंत्रित सदस्य करण्यात आले आहे. तर पंकजा मुंडे यांना केंद्रात मोठी जबाबदारी देणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.


पक्षाच्या जडणघडणीत दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मुंडे यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले होते. तळागाळातले कार्यकर्ते त्यांनी जोडले होते. उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मुंडे यांनी जोरदार मुसंडी मारून जनाधार मिळवला होता. दिवंगत मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग लक्षात घेता, पंकजा मुंडे यांना ही पक्षाने राज्यात मोठी जबाबदारी दिली. सत्तेत असताना, कॅबिनेट मंत्री पद हे त्यांच्या वाट्याला आले. मात्र 2019 च्या विधानसभेत, पंकजा यांना परळी विधानसभेत पराभव पत्करावा लागला. पक्षातील काही मोठ्या नेत्यांमुळे पराभव झाला असल्याची जाहीर नाराजी, पंकजा यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या जाहीर वक्तव्यावर ही भाजपच्या जेष्ठ नेत्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.

आता त्यांना पक्ष संघटनेत केंद्रीय स्तरावर काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. मात्र पंकजा ताई यांनी महाराष्ट्रात काम केले आहे. त्यांना मानणारा ही राज्यात मोठा वर्ग आहे. असे असताना त्यांना या घडीला केंद्रात पाठवणे योग्य नसल्याचे मत त्यांचे समर्थक खाजगीत व्यक्त करत आहेत. यासंदर्भात मुंडे यांचे निकटवर्तीय आमदार माजी मंत्री सुरेश धस यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले की, पंकजा ताई या प्रदेश कार्यसमितीवर निमंत्रक सदस्य आहेत. खासदार प्रीतम मुंडे यांना कार्यकारिणीत स्थान दिल्याबाबत आनंदी आहोत. आता पंकजा ताई यांना केंद्रात संधी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढे बघूया त्यांना काय जबाबदारी देण्यात येते. मात्र पंकजा ताई यांच्याशी बोलून पक्षाने हा निर्णय घेतला असावा, असेही धस म्हणाले.


भाजपचा मित्र पक्ष, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर हे ही पंकजा मुंडे यांचे अतिशय जवळचे मानले जातात. अनेकदा त्यांनी जाहीरपणे पंकजा या आपल्या भगिनी असल्याचे सांगितले आहे. त्यांनीही या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. कार्यकारिणीची निवड ही भाजपची अंतर्गतबाब आहे. पंकजा यांच्याशी केंद्रातल्या संधी बाबत बोलणे झाले नाही. त्यांच्याशी बोलणे झाल्यानंतर याबाबत भाष्य करता येईल, असे जानकर म्हणाले.

पक्षात बाहेरून आलेल्यांची मांदियाळी -
भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या चित्र वाघ, खासदार डॉ. भारती पवार आणि आमदार प्रसाद लाड यांना संधी देण्यात आली आहे. तर प्रदेश कार्य समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये खासदार नारायण राणे, काँग्रेसमधून आलेले आमदार राधाकृष्ण विखे, आमदार गोपाळ अग्रवाल, रामशेठ ठाकूर, हर्षवर्धन पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीतून भाजपात आलेले गणेश नाईक, विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड आणि खासदार उदयनराजे भोसले यांना ही संधी देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details