मुंबई - उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ‘मातोश्री’वर सकाळी 11:30 वाजता शिवसेनेच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे सर्व आमदारांचं मत जाणून घेणार आहेत. यावेळी शिवसेना पुढील राजकीय वाटचाल ठरवणार असल्यामुळे फक्त सेनाच नाही, तर भाजपचे डोळेही या बैठकीकडे लागून राहिले आहेत.
दुसरीकडे, साधारण त्याच वेळी चंद्रकात पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार हे भाजपचे ज्येष्ठ नेते राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. भाजप नेत्यांनी सकाळी साडेदहा वाजता राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र आता ही वेळ बदलून दुपारी दोन वाजताची करण्यात आलेली आहे.
शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अडून बसलेली आहे. सत्तास्थापनेचा जादुई आकडा गाठण्यात भाजपला अपयश आलेलं आहे. अपक्षांच्या पाठिंब्यानेही भाजपला खुर्ची मिळवण्याची जादू करणं मुश्किल आहे. मुख्यमंत्रिपदासह सर्व पदं आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप ही शिवसेनेची मागणी कायम आहे.