मुंबई- राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्र भाजपकडून नवीन प्रदेश कार्यकारिणी आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.
२०२४ च्या महाविजयासाठी सज्जभाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वीच जम्बो कार्यकारिणीची माहिती दिली आहे. ते म्हणाले, दर तीन वर्षांनी प्रदेश कार्यकारिणीची नव्याने रचना होत असते. जुन्या कार्यकारिणीला साडेतीन वर्षांचा कालावधी झालेला आहे. खरेतर १२ ऑगस्ट २०२२ ला ते प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नवीन कार्यकारिणी अपेक्षित होती. ती कार्यकारिणी आज निश्चित होणार आहे. या कार्यकारिणीच्या माध्यमातून २०२४ च्या महाविजयासाठी भाजप सज्ज होत आहे. ४८ लोकसभा आणि २०० पेक्षा जास्त विधानसभा युतीत जिंकण्याचा आमचा निश्चय असून त्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहोत. जुनी आणि नवीन कार्यकारिणी मिळून आम्ही एकत्रित हा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये चांगले यश आम्हाला प्राप्त होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
किती जणांची असणार नियुक्ती-राज्यात २८८विधानसभा समन्वयक देखील लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नव्या जिल्हाध्यक्षांची टीम सुद्धा मे महिन्याच्या अखेरपर्यंत सज्ज होणार आहे. साधारणत: मे महिन्याच्या अखेरपर्यंत संघटनात्मक बदल पूर्ण करण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. या नवीन कार्यकारणीत किती नवीन चेहऱ्यांना समाविष्ट केले जाते, हे पाहणे सुद्धा फार महत्त्वाचे राहणार आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्यात उपमुख्यमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडवणीस यांच्याच आदेशाने सर्व हालचाली होत आहेत. फडणवीस यांच्या निकटवर्तीयांना या कार्यकारणीत संधी मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे.
जुन्या कार्यकर्त्यांसाठी अमृतकुंभ अभियान- भाजपने २०२४ लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून त्या दृष्टिकोनातून जुने-नवे सर्व कार्यकर्ते मिळून काम करणार आहेत. जनसंघापासून ते भारतीय जनता पार्टीच्या निर्माणापर्यंत पक्षात ६०- ६५ वर्षे वयाचे जे ज्येष्ठ नेते आहेत. त्या नेतृत्वाचाही आदर करून त्यांना नानासाहेब तथा उत्तमराव पाटील अमृतकुंभ अभियानातून सहभागी करून घेतले जात आहे.
बाजार समितीत भाजपा क्रमांक एक-बाजार समितीच्या आताच झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी नंबर एक वर असल्याचे त्यांच्या नेत्याकडून सांगितले जात होते. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नंबर एक वर असल्याचे सांगितले. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले आहेत की, त्यांनी आकडे बघावेत, ते सहाव्या नंबरवर आहात. तुमच्यापेक्षा प्रकाश आंबेडकर पुढे आहेत. त्यामुळे काही बोलू नका. भाजपने या निवडणुकीत पहिल्यांदाच मुसंडी मारली असून सहकार क्षेत्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आजवर ताबा राहिला आहे. खरे तर आमचेच अभिनंदन झाले पाहिजे. कारण पहिल्यांदाच आम्ही या निवडणुकीत उतरलो होती तरीसुद्धा एक नंबरवर आलो आहोत.
ठाकरे स्वतःच भुईसपाट होतील-अमित शाहांना भुईसपाट करण्याची भाषा ठाकरे यांनी केली आहे. यावर बावनकुळे म्हणाले आहेत की, मला वाटते स्वत: ठाकरे केव्हा भुईसपाट होतील ते कळणार सुद्धा नाही. तसेही ते आजही भुईसपाट झालेच आहेत. अद्याप किंचित बाकी उरले आहेत. तुम्हाला दररोज तुमचे लोक सोडून जात आहेत. तुमच्याकडे थांबायला कुणी तयार नाही आहे, पण बोलणे मात्र फार आवेशात आहे. अमित शाहांवर टीका करण्याची तुमची लायकी नाही आहे. कुठे सूर्य आणि कुठे दिवा! कशाला स्वतःचे हसे करून घेता? तुम्ही रोज ट्रोल होत आहात आणि तुमचेच नेते तुमच्याबद्दल काय बोलत आहेत त्याची माहिती करून घ्या, असेही बावनकुळे म्हणाले आहेत.
हेही वाचा-Sharad Pawar Resignation: शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर पृथ्वीराज चव्हाणांनी दिले सोनिया गांधींचे उदाहरण, म्हणाले...