नवी मुंबई: नवी मुंबईतील खारघर सेंट्रल पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात मृत्यू झालेल्या श्री सदस्यांचे पोस्ट मोर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये 14 पैकी 12 श्री सदस्यांचा मृत्यू सात ते आठ तास उपाशी राहिल्यामुळे झाला आहे. तर कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याचेही व्हिडिओ समोर आला आहे. खारघर परिसरात महाराष्ट्र भूषण सोहळ्यात 14 श्री सदस्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. या लोकांचा मृत्यू उष्माघाताने झाला असा दावा राज्य शासनाने केला होता. मात्र या कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी झाल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामुळे नक्की उष्माघाताने की चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाला ही प्रश्न समोर उभा आहे.
काहीही न खाल्ल्याने मृत्यू: महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्या 14 पैकी 12 जणांनी सहा ते सात तासांपासून काहीच खाल्ले नव्हते, असे पोस्टमॉर्टम अहवालात स्पष्ट झाले आहे. तर उर्वरित दोन जणांनी काही खाल्ले होते की नाही ते स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्याचबरोबर यातील काही श्रीसदस्यांना अगोदरपासून विविध व्याधी होत्या. त्यातच वेळेवर न खाणे आणि अतिउष्ण वातावरण याची भर पडली, त्यामुळे मृत्यू झाला आहे.