Heatstroke Death Update : महाराष्ट्र भूषण सोहळ्यादरम्यान उष्माघाताचा कहर; मृत्यूचा आकडा 13 वर - उष्माघाताचा फटका
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 13 वर पोहचली आहे. विरोधी पक्षाने आता या प्रकरणी सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र भूषण सोहळ्यादरम्यान उष्माघात
By
Published : Apr 17, 2023, 6:11 PM IST
|
Updated : Apr 17, 2023, 6:44 PM IST
मुंबई : काल नवी मुंबईत महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान उपस्थित लोकांना उष्माघाताचा फटका बसला होता. आता या प्रकरणी मृतांची संख्या 13 वर पोहोचली आहे. सध्या 18 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी बाधितांसाठी 75 रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या, असे राज्यमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली रुग्णालयाला भेट : काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नवी मुंबईतील खारघरमध्ये एमजीएम कामोठे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लोकांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या प्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.
राज ठाकरे यांनी केली टीका :महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने या कार्यक्रमाचा वापर त्यांच्या राजकीय फायद्यासाठी केला, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. या सोबतच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.
एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी :या दुर्घटने प्रकरणीआम आदमी पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन यांनी या प्रकरणी शक्तिप्रदर्शनासाठी या सरकारने बंदिस्त सभागृहात कार्यक्रम न घेता खुल्या मैदानात घेतला. हे सरकार लोकांच्या जीवाची आहुती द्यायलाही तयार आहे, अशी बोचरी टीका केली आहे. तसेच त्यांनी या दुर्घटनेनंतर सरकारने पीडितांना केलेल्या मदतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.