मुंबई -विधानसभा निवडणुकीत अनेक विद्यमान नगरसेवक आपली पदोन्नती व्हावी या हेतूने नशीब आजमावत होते. यात, ईशान्य मुंबईतील भाजपचे नगरसेवक पराग शहा आणि शिवसेनेचे नगरसेवक रमेश कोरगावकर यांनी दमदार विजयासह आमदारकीचा मान मिळवला आहे.
ईशान्य मुंबईतील दोन नगरसेवक झाले आमदार! घाटकोपर पूर्वमधील भाजपचे उमेदवार पराग शहा आणि भांडूपमधील शिवसेनेचे उमेदवार रमेश कोरगावकर यांच्यातील एक समान धागा म्हणजे या दोघांच्याही उमेदवारीला मोठा विरोध झाला होता. या मतदारसंघात बंडही होण्याची शक्यता वर्तवली जात होती. कारण, या दोन्ही ठिकाणी विद्यमान आमदार प्रकाश मेहता तसेच, अशोक पाटील यांना नारळ देऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. मात्र मतदारांनी उमेदवारांकडे न पाहता, या ठिकाणी पक्षाला मतदान करत मोठ्या मताधिक्याने या दोन्ही उमेदवारांना निवडून दिले आहे.
घाटकोपरमध्ये प्रकाश मेहता यांना तिकीट नाकारल्यानंतर पराग शहा यांना मोठा विरोध झाला. मेहता समर्थकांनी शहांची गाडीही फोडली होती. असाच काहीसा प्रसंग कोरगावकर यांच्याबाबतीत सुध्दा घडला होता. उमेदवारी नाकारल्यानंतर पाटील यांनी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी ठिय्या आंदोलन केले होते. मात्र, या दोघांच्या रोषाचा फारसा परिणाम मतांवर पडला नाही.
पराग शहांनी 50 हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला. दुसरीकडे, कोपरकर यांनी 29 हजार मतांच्या फरकाने मनसेच्या संदीप जळगावकर यांचा पराभव केला. यामुळे, या मतदारसंघात युतीचेच वर्चस्व आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
हेही वाचा : सक्षम प्रतिस्पर्धी नसल्याने नवी मुंबईत महायुतीच्या पारड्यात विजय