महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धारावी मतदारसंघ काँग्रेसच्या वर्षा गायकवाड राखणार का?

काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघात आमदार आहेत. शिवसेनेचे बाबुराव माने आणि भाजपच्या दिव्या ढोले यांचा गायकवाड यांनी गेल्या वेळी पराभव केला.

By

Published : Sep 17, 2019, 8:29 PM IST

धारावी मतदारसंघ

मुंबई- आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी मुंबई शहरातला पहिला विधानसभा मतदारसंघ आहे. इथले बहुसंख्य मतदार हे मुस्लीम आहेत. त्याशिवाय, मराठी, दक्षिण भारतीय आणि काही प्रमाणात गुजराथी मतदारही आहेत. त्याचा परिणाम साहजिकच इथल्या आमदार निवडीवर देखील होतो. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघात आमदार आहेत. शिवसेनेचे बाबुराव माने आणि भाजपच्या दिव्या ढोले यांचा गायकवाड यांनी गेल्या वेळी पराभव केला. यंदा मात्र दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या धारावी मतदारसंघात वेगळे चित्र आहे, लोक विद्यमान आमदार गायकवाडांवर कामे झाली नाहीत म्हणून नाराज आहेत.

धारावी मतदारसंघ आढावा

हेही वाचा -‘स्वाभिमान’ हा शब्द सध्या कोणत्याही राजकारण्याने वापरू नये

काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावी विधानसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून कोण उमेदवार असणार याची उत्सुकता आहे. धारावी विधानसभा मतदारसंघ हा 178 क्रमांकांचा मतदारसंघ आहे. मुंबईतल्या विधानसभा मतदार संघांपैकी सर्वात वेगळा मतदारसंघ म्हणून धारावी मतदारसंघाकडे बघितले जाते. आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून या परिसराची ओळख. या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, मोठ्या प्रमाणात नागरिक इथं राहतात. याशिवाय शेकडो छोटे-मोठे लघु उद्योगही परिसरात केले जातात. अनेक जाती धर्माच्या लोकांचे वास्तव्य येथे आहे. अनुसूचित जाती जमातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. इथे 33 टक्के मुस्लीम, 25 टक्के मराठी, 25 टक्के दक्षिण भारतीय तर 5 टक्के गुजराथी समाजाचे मतदार आहेत.

अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात आजपर्यंत भाजपला आपला आमदार निवडून आणता आलेला नाही. प्रामुख्याने काँग्रेसचेच वर्चस्व इथे राहिले आहे. १९९९ मध्ये एकदा येथे शिवसेनेचे बाबुराव माने निवडून आले होते. त्याव्यतिरिक्त हा काँग्रेसचाच गड मानला जातो. धारावी पुनर्विकासाचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. शिवाय इथल्या नागरी समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे. हे मुद्दे प्रत्येक निवडणुकीत चर्चेला येतात. या मतदारसंघात एकूण २७५ मतदान केंद्र आहेत.

हेही वाचा -आले किती गेले किती? पक्षनिष्ठा म्हणजे काय रं भाऊ..! जिथं सत्ता तिथं जाऊ

काँग्रेस बरोबरच भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात धारावीसाठी काहीही केले नसल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. 2004 पासून धारावीचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेवर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावीचा पुनर्विकास प्राधान्याने केला जाईल, असे स्पष्ट केले होते. आता सरकारला पाच वर्षे पूर्ण होत आलीत. पण अद्याप विकासक निश्चित होऊ शकलेला नाही. भाजप सरकारने सुरुवातीला 2016 मध्ये जागतिक पातळीवर निविदा जारी केल्या. परंतु, त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे धारावीचे केलेले पाच भाग रद्द करून एकात्मिक विकासासाठी अलीकडेच निविदा जारी करण्यात आल्या असल्या तरी त्या पलीकडे काहीही झालेले नाही. तसेच तीन टर्म आमदार राहिलेल्या वर्षा गायकवाड यांनी मतदारसंघाच्या विकासाकडे लक्ष दिले नसल्याचाही आरोप जनतेतून होताना दिसतोय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धारावी विधानसभा मतदार संघातून काँग्रेस उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी शिवसेनेचे विजयी उमेदवार राहुल शेवाळे यांना पिछाडीवर टाकले होते. त्यामुळे या मतदारसंघात काय होणार ते नक्की कोणालाही सांगता येत नाही.

हेही वाचा -विधानसभा 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं; प्रत्येकी 125 जागा लढवणार

2004 पासून ते 2014 पर्यंत प्रत्येक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड धारावीतून सातत्याने विजयी झाल्या. 2014 च्या निवडणुकीत मुख्य चारही पक्ष वेगवेगळे लढले. त्यामुळे प्रत्येक पक्षाची ताकत या मदारसंघात दिसून आली. 2014 मध्ये मोदी लाट असूनही वर्षा गायकवाड या मोठ्या मताधिक्याने जिंकून आल्या होत्या.

या वेळेसही काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित आहे. आघाडीकडून त्या उमेदवार असतील. तर भाजप आणि शिवसेना युतीतून लढणार असल्याची सध्या चर्चा आहे. त्यामुळे यावेळी युतीचा उमेदवार कोण असणार आहे यावर अजून प्रश्नचिन्ह आहे. या जागेसाठी शिवसेना आग्रही असली तरी भाजपच्या दिव्या ढोले यांनी या मतदारसंघातून तयारी सुरू केली आहे. तर शिवसेनेचे बाबुराव माने आणि मनोहर रायबागे हे देखील निवडून लढवण्यासाठी सज्ज झालेत.पण अजून युतीच काही नक्की नाही. पण भाजप व शिवसेना इच्छुक उमेदवार काँग्रेस उमेदवार गायकवाड यांना चॅलेंज देऊन 'वेट अँड वॉच' बोलत यंदा पराभव करण्याचं बोलत आहेत. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत जनता कोणाला कौल देणार व धारावी मतदारसंघ कोण मिळवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती

मतदारांची संख्या

पुरुष – १,३८,०८३
महिला – १,००,९९०

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) वर्षा गायकवाड, काँग्रेस – ४७,७१८
२) बाबुराव माने, शिवसेना – ३२,३९०
३) दिव्या ढोले, भाजप – २०,७६३
४) हनुमंत नंदीपल्ली, अपक्ष – ५३३३
५) संदीप काटके, बसप – ३१४३

नोटा – १४३६

मतदानाची टक्केवारी – ४९.४२ %

ABOUT THE AUTHOR

...view details