मुंबई- महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल येणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेवर आज निर्णय येणार आहे. दरम्यान, शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवणारे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचे नाव सध्या चर्चेत आहे. त्यांनीच 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. त्यामुळे सत्तापेच आणखी वाढला होता.
16 आमदारांना केले होते निलंबित -नरहरी झिरवळ यांच्या आदेशामुळे एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची तलवार लटकली आहे. अपात्रतेची टांगतील तलवार लटकत असलेले आमदार पुढीलप्रमाणे- एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदिपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, चिमणराव पाटील, रमेश बोरणारे.
नरहरी झिरवळांकडे होते अधिकार - राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भूमिका महत्त्वाची ठरते. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले. होते त्यानंतर हे पद रिक्तच राहिले होते. परिणामी विधानसभेचे कामकाज उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पाहिले होते. अध्यक्षांच्या अनुपस्थितीत सर्व कामकाज आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या उपाध्यक्षांना निभावाव्या लागतात.
नरहरी झिरवळ कोण आहेत? - नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांची उपाध्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. वंचितांसाठी काम करणारे नेते अशी झिरवळांची ओळख आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मर्जीतले आमदार म्हणून झिरवळ यांची ओळख आहे. झिरवळ हे अतिशय साधे आणि नम्र असल्याचे त्यांना ओळखणारे लोक सांगतात. त्यांचे घर देखील खूप साधे आहे. झिरवळ हे शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत आणि थेट लोकांच्या संपर्कात असलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. आदिवासी समुदायातील लोकांसाठी झटणारे नेते अशी त्यांची ओळख आहे.
सत्तासंघर्षासंदर्भातल्या सर्व बातम्या वाचा येथे -