महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 3, 2019, 4:58 PM IST

Updated : Sep 3, 2019, 5:12 PM IST

ETV Bharat / state

कृष्णा पाणी वाटप; आंध्र, तेलंगणाच्या मागणीला महाराष्ट्र, कर्नाटकचा विरोध

कर्नाटकचे मुख्यमंत्री  येडियुरप्पा एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. याच बरोबर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध मुद्यांवर चर्चा केली. यात कृष्णा नदीच्या पाणी वाटपाचा महत्त्वाचा मुद्दा चर्चिला गेला.

मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई - गेली अनेक दिवस आंध्रप्रदेश आणि तेलंगणाने कृष्णा नदीच्या पाणी वाटपाचा फेरविचार करण्याची याचिका कृष्णा पाणी वाटप लवादाकडे केली होती. या याचिकेला महाराष्ट्र आणि कर्नाटक संयुक्तरित्या विरोध करणार असल्याचा निर्णय दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही मुख्यमंत्र्यांनी एकमताने कृष्णेच्या पाणी वाटपाच्या आंध्र आणि तेलंगणाच्या मागणीला संयुक्त विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली.

येडियुरप्पा यांनी गणपती बाप्पांचे दर्शन घेतले

हेही वाचा-पुढील मुख्यमंत्री फडणवीसच... अनंत चतुर्दशीनंतर होणार जागा वाटपाची घोषणा - रामदास आठवले

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. याच बरोबर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध मुद्यांवर चर्चा केली. यात कृष्णा नदीच्या पाणी वाटपाचा महत्त्वाचा मुद्दा चर्चिला गेला. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांनी कृष्णा नदीच्या सध्याच्या पाणी वाटपावर आक्षेप घेतला. या पाणी वाटपाची फेररचना करण्याची मागणी लवादाकडे केली आहे. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी तब्बल अर्धा तास चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. या चर्चेनंतर आंध्र आणि तेलंगणाच्या मागणीला संयुक्त विरोध करण्याचा निर्णय झाला.

विविध मुद्यांवर चर्चा करताना मुख्यमंत्री

कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पूरस्तिथी नियंत्रणात आणण्यासाठी उच्चस्तरीय समिती-

वर्षा निवासस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यात झालेल्या बैठकीत नुकत्याच कर्नाटक आणि महाराष्ट्रात आलेल्या पुराबाबतही चर्चा झाली. दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात या पुरात मालमत्ता आणि जीवितहानी झाली होती, अशी आपत्ती पुन्हा होऊ नये यासाठी दोन्ही राज्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या चर्चेदरम्यान कर्नाटकचे उपमुख्यमंत्री अश्वनारायण, गृहमंत्री बसवराज बोम्मई तसेच महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वेळेत न झाल्यामुळे महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा भागात महापूर आल्याची चर्चा होत आहे. मात्र, यावर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले नाही.

Last Updated : Sep 3, 2019, 5:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details