मुंबई -राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची विक्री, मूल्य साखळीचे बळकटीकरणाच्या अनुषंगाने विविध योजनांची सांगड घालण्यासाठी कृषी प्रक्रिया संचलनालयाची निर्मिती करणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. कृषी हवामानानुसार विविध पिकांचे क्लस्टर विकसित करणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कृषी प्रक्रिया, कृषी मूल्य साखळी बळकटीकरण व कृषी मालाची विक्री व्यवस्था बळकटीकरणाच्या अनुषंगाने विविध योजनांची सांगड घालण्यासाठी मंत्रालयात कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरज कुमार, कृषी संचालक सुभाष नागरे, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कृषी मालाचा 'महाराष्ट्र ब्रँड' विकसित करण्यासाठी विशेष टास्क फोर्स - कृषीमंत्री भुसे
राज्यात कृषी प्रक्रिया व मालाची विक्री, मूल्य साखळीचे बळकटीकरणाच्या अनुषंगाने विविध योजनांची सांगड घालण्यासाठी कृषी प्रक्रिया संचलनालयाची निर्मीती करणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
योजनांच्या समन्वयासाठी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करण्यात येणार
नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प, बाळासाहेब ठाकरे ग्रामीण व कृषी परिवर्तन प्रकल्प, प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजना, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना, गट शेती योजना यासारख्या वेगवेगळया योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा समन्वयासाठी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करण्यात येणार आहे, असे भुसे यांनी सांगितले. अस्तित्वात असलेल्या कृषी प्रक्रिया सुविधांचे मॅपिंग करून त्यात भर टाकण्यासाठी व उणीवा दूर करण्यासाठी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमांतून अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे. कृषी प्रक्रिया उद्योगाबाबत कौशल्य असलेल्या तज्ज्ञांच्या सेवेचा वापर करून मूल्य साखळी विकसित करतांना समन्वय ठेवावा, असे निर्देशही कृषीमंत्र्यांनी यावेळी दिले.
विशेष टास्क फोर्सची निर्मीती करावी
कृषी मालाचा महाराष्ट्र ब्रँड विकसित करण्यासाठी उत्पादन निहाय मानके निश्चित करावी. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या तालुक्यात शहरीकरण मोठया प्रमाणावर झाले असल्याचे लक्षात घेवुन या भागात कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा ही विक्री व्यवस्था बळकट करण्यासाठी वापरावी व याकरीता विशेष टास्क फोर्सची निर्मीती करावी. महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळ व कृषी विद्यापीठे यांनी देखील या बाबींकडे विशेष लक्ष देवुन कृषी प्रक्रिया, कृषी मूल्य साखळी बळकटीकरणासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करावेत, असेही भुसे यांनी सांगितले.