महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Monsoon Session 2023: उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसावरून विधानपरिषदेत खडाजंगी, उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधात अनिल परब का भडकले?

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात उपसभापती नीलम गोऱ्हे व आमदारांमध्ये दररोज कुठल्या न कुठल्या विषयावर वाद होताना दिसत आहे. गुरुवारी ठाकरे गटाचे आमदार नेते अनिल परब व उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यात वाद रंगला. वादाचा विषय हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस होता. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने ठाकरे गटातील आमदारांना सायंकाळी लवकर जायचे होते. पण त्यांना जाऊ न दिल्याने हा वाद झाला.

Monsoon Session 2023
अनिल परब व उपसभापती नीलम गोऱ्हे

By

Published : Jul 28, 2023, 10:29 AM IST

Updated : Jul 28, 2023, 10:47 AM IST

मुंबई :यंदाचे पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहे.बुधवारी उपसभापतींनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सभागृहातील गैरवर्तणूकीसाठी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. तोच दुसऱ्या दिवशी अनिल परब यांच्यावरही उपसभापती भडकल्या. यामागचे कारण उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या गटातील सर्व आमदारांना त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर जायचे होते. यासाठी आमदार अनिल परब यांनी ६ वाजताच सभागृह तहकूब करण्याची मागणी उपसभापतींकडे केली होती. मात्र, उपसभापतींनी ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे अनिल परब यांचा पारा चढला. त्यांनी उपसभापतींना आपणच दरवर्षी हा प्रस्ताव मांडत असताना आज काय झाले? असा सवाल केला. तसेच ठाकरे गटाच्या सर्व आमदारांनी यावेळी आज ६ वाजता सभागृहाचे कामकाज स्थगित करावे, अशी मागणी केली होती.


ठाकरे गट व भाजपा आमदार यांच्यात वाद :उद्धवठाकरे गटाच्या आमदारांनी केलेल्या मागणीवर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी, ज्या सदस्यांना जायचे असेल त्यांनी जावे, परंतु सभागृह दैनंदिन कामकाज संपेपर्यंत सुरुच राहील, अशी भूमिका घेतली. प्रवीण दरेकर यांच्या या भूमिकेमुळे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब, सुनील शिंदे, सचिन अहिर व इतर आमदार चांगलेच भडकले. याच मुद्द्यावर ठाकरे गट व भाजपा आमदार यांच्यात वाद झाला.



सभागृहात मोठा गदारोळ :भाजपा व ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये हा वाद रंगलेला असताना त्याला प्रतिउत्तर देताना उपसभापती गोऱ्हे यांनी अनिल परब यांना उद्देशून आपण कामकाज संपल्यानंतर जाऊ शकता. परंतु आत्ता घाई करू नका. आज दिवसभराचे बरेच कामकाज शिल्लक असून मी सभागृह स्थगित करणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे सभागृहात ठाकरे गटाच्या सर्व आमदारांनी गदारोळ केला. त्यानंतर परब यांनी ताठर भूमिका घेत आम्हीही लवकर जात नाही, आजचे सर्व कामकाज घ्या असे सांगितले. आम्हाला सुद्धा विधेयकावर बोलायचे आहे. जर सत्ताधारी विरोधकांना सहकार्य करत नसतील तर आमच्याकडून सुद्धा सहकार्याची अपेक्षा ठेऊ नका, असे ठणकावून सांगितले. त्यावर सत्ताधाऱ्यांनी आम्हाला सहकार्य नको असे सांगितल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला.



प्रश्नांचा भडीमार :यानंतर मंत्री अतुल सावे हे गृहनिर्माण विभागासंबधीचे विधेयक मांडत असताना ठाकरे गटाच्या आमदारांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्या प्रश्नांना मंत्री अतुल सावे यांना व्यवस्थित उत्तरे देता आली नाहीत. त्यांना हे विधेयक आणण्यामागील कारण सुद्धा ठळकपणे सांगता आले नाही. अखेर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हस्तक्षेप करत उपमुख्यमंत्री या विधेयकांसंदर्भात सविस्तर निवेदन करतील, असे सांगितल्याने विरोधकांचे समाधान झाले.

हेही वाचा :

  1. Monsoon session 2023: मणिपूरच्या मुद्द्यावर सरकार बरंच काही लपवत असल्याचा संशय - पृथ्वीराज चव्हाण
  2. Nitin Gadkari News : महामार्गाला आता 'बाहुबली'चे संरक्षण, छत्तीसगडमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार प्रयोग
  3. Monsoon Session 2023: सातव्या दिवशी विरोधक आक्रमक, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारीविरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन
Last Updated : Jul 28, 2023, 10:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details