मुंबई - राज्यातील 'ब' आणि 'क' गटांच्या पदभरतीची परीक्षा घेण्यासाठी वापरण्यात येणारे महापोर्टल रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गुरुवारी या संदर्भातील निर्णय देण्यात आला. आता या गटाच्या परीक्षा घेण्यासाठी सेवा देणाऱ्या संस्थांची सूची तयार करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढील परीक्षा नव्या संस्थेमार्फत घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य शासनाच्या सर्व प्रशासकीय विभागातील 'ब' आणि 'क' गटातील पदभरतीची परीक्षा महापोर्टलद्वारे करण्यात येत होती. या पोर्टलमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच हे पोर्टल बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी हे पोर्टल रद्द करण्याचा निर्णय घेतला.