मुंबई :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६७ व्या महापरिनिर्वाण दिन आहे. दरवर्षीप्रमाणं या वर्षीसुद्धा मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी गर्दी केली आहे. समाजाला दिशा देणाऱ्या बाबासाहेबांना आज संपूर्ण देश अभिवादन करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा महामानवाला अभिवादन करत ते बाबासाहेबांच्या योगदानापुढं नतमस्तक झाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्यपाल रमेश बैस यांच्यासह अनेकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केलं.
सामाजिक एकोपा निर्माण करणारे नेते : पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे. 'भारतीय संविधानाचे शिल्पकार असण्यासोबतच बाबासाहेब सामाजिक एकोपा निर्माण करणारे नेते होते. त्यांनी कायमच समाजातील शोषित आणि वंचित घटकांसाठी जीवन समर्पित केलं. आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना अभिवादन करतो', असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
- विनम्रतापूर्वक अभिवादन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत 'एक्स' मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्रतापूर्वक अभिवादन."