मुंबई Mahaparinirvan Divas Special Facilities : 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर आणि चैत्यभूमी या ठिकाणी युटीएस विशेष काउंटर सुरू करण्यात आले आहेत. त्याशिवाय दोन हेल्प डेक्सदेखील सुरू करण्यात आलेत. दादरच्या फलाट क्रमांक 6 आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस चा फलट क्रमांक 1 या ठिकाणी प्रवाश्यांना मार्गदर्शन आणि तिकिटासंदर्भात माहिती देण्यासाठी युटीएस काउंटर सुरू राहतील. दुसरीकडे महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या मुंबईत शासकीय आणि महापालिका कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारनं ही सुट्टी जाहीर केली आहे.
रेल्वेकडून वैद्यकीय पॅरा मेडिकल स्टाफ तैनात :मध्य रेल्वेच्या मुंबई दादर, कल्याण, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी प्रवाशांच्या मदती करता पॅरामेडिकल स्टाफ 5 आणि 6 डिसेंबर रोजी 24 तास तैनात केले जातील. तर दादर रेल्वे स्थानकात 24 तास रुग्णवाहिका उभी राहणार आहे. जेणेकरून अनुयायींना कोणतीही आरोग्य विषयक समस्या जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सेवा याद्वारे दिली जाईल.
"मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं दादर रेल्वे स्थानकाच्या परिसरात तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करून देण्यात आलीय. त्यामुळं नागरिकांनी त्याचा वापर करावा"- डॉ. शिवराज मानसपुरे,मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे