महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापरिनिर्वाण दिन - अनुयायांना सेवा सुविधेसाठी पालिकेचे ५ हजार कर्मचारी कार्यरत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर परिसरातील चैत्यभूमी स्मारक येथे आठवडाभरात लाखोंच्या संख्येने अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. या अनुयायांना मुंबई महापलिकेकडून सेवा सुविधा देण्यात आल्या आहेत.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 6, 2022, 7:43 PM IST

मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर परिसरातील चैत्यभूमी स्मारक येथे आठवडाभरात लाखोंच्या संख्येने अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. या अनुयायांना मुंबई महापलिकेकडून सेवा सुविधा देण्यात आल्या आहेत. या सेवा सुविधा अनुयायांना मिळाव्यात यासाठी तब्बल ५ हजार कामगार, कर्मचारी, अधिकारी अव्याहतपणे कार्यरत आहेत.

तात्पुरता निवारा, थेट प्रक्षेपण -भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाच्या कानाकोप-यातून आणि परदेशातून देखील असंख्य अनुयायी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी स्मृतिंना अभिवादन करण्यासाठी येत असतात. या अनुयायांना विविध नागरी सेवा-सुविधा महानगरपालिकेद्वारे समर्थपणे उपलब्ध करुन देण्यात येत असतात. यानुसार यंदा देखील तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही.आय.पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह मोबाईल चार्जिंग सुविधा इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर चैत्यभूमीतील आदरांजलीचे मोठ्या पडद्यावर आणि समाज माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

भोजन आणि आरोग्य सुविधा -यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी अनुयायांना महानगरपालिके द्वारे भोजन देखील उपलब्ध करुन देण्यात आले. या भोजन वाटपासाठी एक स्वतंत्र मंडप उभारण्यात आला आहे. तसेच दोन्ही परिसरांमध्ये विविध ठिकाणी आरोग्य सेवा-सुविधा दिवस-रात्र पद्धतीने अव्याहतपणे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवांसह रुग्णवाहिका देखील नियमितपणे तैनात आहेत. या व्यतिरिक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असणारे हिंदु कॉलनीतील राजगृह, वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी देखील विविध नागरी सेवा-सुविधा बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

५ हजार कर्मचारी कार्यरत -बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विविध ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नागरी सेवा सुविधा अनुयायांना यथायोग्य प्रकारे मिळाव्यात, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागासह इतर विभागातील सुमारे ५ हजार इतक्या संख्येने कामगार, कर्मचारी, अधिकारी अव्याहतपणे कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम असणा-या बेस्ट उपक्रमाद्वारे सर्व संबंधित ठिकाणी अतिरिक्त विद्युत दिवे, पथदिवे इत्यादी बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर विद्युत पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी उच्च क्षमतेचे ४ जनित्र देखील सुसज्ज ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर दादर चौपाटी, महापौर निवास व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ज्ञानेश्वर उद्यान या ठिकाणी प्रखर प्रकाश असणारे उच्च क्षमतेचे सर्च लाईट देखील बसविण्यात आले आहेत.


यांनी केले अभिवादन -भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईच्या दादर परिसरातील चैत्यभूमी स्मारक येथे महाराष्‍ट्र राज्‍याचे राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खासदार राहुल शेवाळे, माजी मंत्री नाना पटोले, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, किरीट सोमय्या, आमदार भाई जगताप, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा आणि मान्यवरांनी अभिवादन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details