मुंबई -महानंद डेअरीकडून ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आली आहे. महानंद दूध आता 2 रुपयांनी स्वस्त झाले आहे. घसरलेली विक्री वाढवण्यासाठी दुधाच्या दरांमध्ये प्रति लिटर दोन रुपयांची कपात केली आहे.
महानंद डेअरीचे दूध 2 रुपयांनी स्वस्त - महानंद दूध दर बातमी
सध्या राज्यात लॉकडाऊनमुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली आहे. दूध अत्यावश्यक सेवांमध्ये येते. मात्र, महानंद दुधाच्या खपामध्ये घट झाली आहे. त्यामुळे महानंद डेअरीने आपल्या दुधाचे दर प्रतिलीटर 2 रुपयांनी कमी केले आहेत.
राज्यात गेल्या वर्षी दुधाचा तुटवडा निर्माण झाला होता. शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे महानंद आणि अनेक दूध डेअरींनी दुधाच्या विक्री दरात 2 रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर राज्यात आता पुन्हा लॉकडाऊन झाल्याने महानंदच्या दुधाचे एकूण वितरण दीड लाखापर्यंत खाली आले आहे. ते वाढवण्याबरोबरच आर्थिक अडचणीतील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी दुधाचा प्रतिलिटर दर 48 रुपयांवरून 46 रुपये केल्याचे महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी सांगितले.