मुंबई - सर्वच प्रवाशांना रेल्वेतून बाहेर काढण्यात यश आले असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल उदासी यांनी दिली.
रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांना अन्न आणि पाणी पुरवण्यात आले होते. त्यांना हवे ते मदतकार्य केले. रेल्वेत अडकलेले सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याची माहिती रेल्वे अधिकारी अनिल कुमार जैन यांनी दिली. पुराच्या पाण्यामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याचेही यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.
बदलापूर ते कर्जत या दरम्यानची रेल्वे वाहतूक सेवा बंद असून, इतर सर्व ठिकाणी वाहतूक सेवा सुरळीत सुरू आहे. रेल्वेची हार्बर लोकल सेवा ही केवळ ५ मिनिटांच्या अंतराने उशिरा चालत असून, मध्य रेल्वेची स्थितीही बरी आहे. तर वेस्टर्न रेल्वेच्या प्रवासात काही अडचणी नसल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अनिल कुमार जैन यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
रेल्वे अधिकारी ए. के. जैन
मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणि त्यांची एकूण स्थिती लक्षात घेऊन आम्ही मध्यरात्रीपासूनच या गाड्यांची वाहतूक पनवेल मार्गाने वळवण्याचा निर्णय घेतला आहे. उल्हास नदीच्या पाण्याची पातळी अचानक आणि वेगाने वाढली, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात आणि ट्रॅकवर पाणी साचायला सुरू झाल्याने आम्ही प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन गाडीला त्या परिसरात थांबवून ठेवले होते. या गाडीमध्ये असलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
या ठिकाणी आमच्या रेल्वेच्या विविध यंत्रणा त्यासोबतच आरपीएफ आणि इतर वैद्यकीय यंत्रणाही या ठिकाणी कार्यरत आहे. कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास त्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे जैन यांनी सांगितले.