मुंबई Mahadev Book App Scam : सध्या चर्चेत आणि वादात सापडलेल्या महादेव बुक अॅप संबंधित मुंबई पोलिसांनी प्रथमच गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी पहिल्यांदाच महादेव बुक अॅप आणि बेटिंग अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर (Saurabh Chandrakar), रवी उप्पल आणि शुभ सोनी यांच्यासह 31 जणांविरुद्ध फसवणूक आणि जुगार कायद्याशी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १५ हजार कोटींचा हा फसवणुकीचा प्रकार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच सामाजिक कार्यकर्ते याबाबत तक्रार घेऊन कोर्टात गेले होते. कोर्टाच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती, माटुंगा पोलीस ठाण्याचे (Matunga Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी दिली आहे.
माटुंगा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश: खिलाडी नावाचा बेटिंग अॅप चालवल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश बनकर यांनी न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर न्यायालयाने माटुंगा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रकाश बनकर यांच्या फिर्यादीवरून माटुंगा पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) आणि जुगार कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात सेलेब्रिटीची चौकशी सुरू: प्रकाश बनकर यांनी दावा केला आहे की, या आरोपीने खिलाडी बेटिंग अॅप वापरून सरकार आणि इतर अनेक लोकांची 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. खिलाडी अॅपच्या साहाय्याने आरोपी जुगार आणि इतर खेळ खेळत होते आणि त्यांनी करोडोंची कमाई केली आहे. आता याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान सौरभ चंद्राकर, रवी उप्पल यांच्यावर यापूर्वी छत्तीसगड पोलिसांनी विविध प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यांच्याविरुद्ध ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला आहे. याबाबत ईडीकडून देशातील वेगवेगळ्या राज्यात सेलेब्रिटीची चौकशी सुरू आहे.
पोलीस चौकशीसाठी नेमकं कोणाला बोलवणार : माटुंगा पोलिसात (Matunga Police) दाखल गुन्ह्यानुसार, आरोपींनी लोकांची सुमारे 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. आता याप्रकरणी माटुंगा पोलीस चौकशीसाठी नेमकं कोणा कोणाला बोलवणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. यामध्ये काही बॉलिवूडच्या ताऱ्यांचा समावेश तर नाही ना याचा देखील पोलीस तपास करणार आहेत. माटुंगा पोलिसांनी याप्रकरणी या गुन्ह्यातील सत्यता पडताळणीस सुरुवात केली आहे.