मुंबई Mahadev App Scam :महादेव गेमिंग ॲपमधील जाहिरातीत झळकल्या प्रकरणी बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरला अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, यासाठी रणबीर कपूरनं दोन आठवड्यांच्या वाढीव वेळ मागितला आहे. त्यातच पुन्हा एकदा बॉलीवूड विश्वात खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खान हे देखील ईडीच्या रडारवर आहेत. यांनाही ईडी चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला देखील छत्तीसगडच्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माला ईडीचं समन्स : महादेव गेमिंग ॲप प्रकरणी सुमारे 5 हजार कोटी रुपयांचा हवाला रॅकेटमुळं ईडीच्या रडारवर बॉलीवूड विश्वातील काही मंडळीची नावं आल्यामुळं बॉलीवूड विश्वात खळबळ उडालीय. महादेव गेमींग ॲपप्रकरणी आता प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आणि अभिनेत्री हुमा कुरेशी, हिना खान या कलाकारांना देखील ईडी चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती समोर येत आहे. ईडीच्या दिल्ली येथील मुख्यालयानं हे समन्स जारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, चौकशी कधी होणार हे अद्याप कळू शकलेलं नाही.
बॉलीवूडमधील नामवंत कलाकार ईडीच्या रडारवर : याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महादेव ॲप कंपनीचं हवाला रॅकेट प्रकाशझोतात आल्यानंतर ईडीनं कंपनीच्या संचालकांविरोधात मनी लॉन्ड्रींचा गुन्हा दाखल केला होता. या ॲपच्या प्रमोशनसाठी जाहिरातीत झळकलेले बॉलीवूडमधील अनेक नामवंत कलाकार सध्या ईडीच्या रडारवर आहेत. महादेव ॲप या कंपनीची स्थापना सौरभ चंद्राकर आणि उप्पल या दोघांनी केली होती. महादेव ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन सट्टेबाजी होत होती. त्याचप्रमाणे हे गेमिंग ॲप देखील आहे. भारतासह अन्य देशांतून हजारो कोटी रुपये यात गुंतल्याची माहिती समोर आलीय. हे हजारो कोटी रुपये परदेशात फिरवण्यात आल्याची माहिती अहवालातून समोर आलीय. महादेव ॲप कंपनीच्या उपकंपनीच्या एका ॲपचं प्रमोशन रणबीर कपूरनं केलं होतं. यासाठी त्यांनं कोटींच्या घरात रोख रकमेनं मानधन स्वीकारल्याचा दावा ईडीनं केलाय. यामुळं रणबीर कपूरला देखील ईडीच्या चौकशीसाठी सामोरं जावं लागणार आहे.
हेही वाचा :
- Ranbir Kapoor: महादेव ॲप घोटाळा प्रकरण; रणबीर कपूरने ईडीकडे मागितला 2 आठवड्याचा वाढीव वेळ
- ED Action On Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूरला ईडीने पाठवले समन्स, ६ ऑक्टोबरला हजर राहण्याचे निर्देश
- Mahadev App scam : ईडीची मोठी कारवाई, सनी लियॉनसह टायगर ईडीच्या पिंजऱ्यात? मुंबईबरोबर अनेक ठिकाणी छापे