मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीत सामील होण्याचा निर्णय इतर मित्र पक्षांनी घेतला आहे. मात्र, त्यांना देण्यात येणाऱ्या जागांवरुन अद्यापही तिढा सुटला नसल्याचे समोर आले आहे. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाआघाडी जाहीर करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. मात्र, त्यात अद्यापही इतर पक्षांशी बोलणी सुरू असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर काही वेळाने शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, माकपा आणि इतर घटक पक्षांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपण आघाडीत सामील होत असल्याचे स्पष्ट केले. मात्र, आघाडीकडून देण्यात येणाऱ्या जागांवरुन आमचा विषय थोडासा अजून झाला नसल्याचे कबुली, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाआघाडीत सामील होणाऱ्या मित्र पक्षांचा 28 जागांवरुन तिढा हेही वाचा-विलासरावांचे धाकटे चिरंजीवही निवडणुकीच्या रिंगणात, भाजपकडून रमेश कराडांचा पत्ता कट
या पत्रकार परिषदेला शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील समाजवादी पक्षाचे अबू असीम आझमी माकपाचे कॉम्रेड अशोक ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत आम्ही राज्यात आघाडी सोबत जात असल्याचे सर्वच नेत्यांनी स्पष्ट केले. मात्र, आघाडीकडून देण्यात येत असलेल्या 28 जागांवर आमचे अजून स्पष्ट एकमत झाले नसल्याचे सांगण्यात आले. आपल्याला अजून १० जागा हव्यात, अशी मागणी या नेत्यांकडून करण्यात आली.
हेही वाचा-औसातून मुख्यमंत्र्यांचे पीए तर निलंग्यामध्ये पुन्हा काका-पुतण्यात लढाई
राजू शेट्टी म्हणाले की, राज्यात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या विरोधात आम्ही सगळेजण संयुक्त पुरोगामी आघाडी स्थापन करुन लोकसभेला ही एकत्र आलो होतो. आता विधानसभेला आम्ही एकत्र आलो आहोत. आणि यावेळी सीपीआय आणि सीपीएम आदी पक्षांचा समावेश झाला आहे. इतर अनेक छोटे-छोटे पक्ष हे आमच्यात सामील होत आहेत. ज्या शक्ती राज्यात माणसामाणसांमध्ये भेट निर्माण करतात, धार्मिक आणि जाती तेढ निर्माण करतात, अशा विरोधात आणि सामाजिक आणि आर्थिक विषय घेऊन निवडणूक लढवणार असल्याचेही राजू शेट्टी म्हणाले. आम्हाला 28 जागा सोडण्याचे आघाडीकडून सांगण्यात आले आहे. त्यात आणखी काही आमची मागणी असून त्या पूर्ण झाल्यास आम्ही त्या-त्या पक्षांमध्ये वाटून घेणार असून त्याचा निर्णय ही आम्ही उद्यापर्यंत जाहीर करू, असे शेट्टी म्हणाले.
शेकाप नेते जयंत पाटील म्हणाले, की आम्ही आघाडीच्या वतीने बोलतोय आम्ही एकत्रच लढणार आहोत. आम्हाला आघाडीकडून 28 जागा मिळाल्या, अजून 12-13 जागांचा निर्णय होईल, असे आम्हाला वाटते. शांततेने आज ही चर्चा झाली. त्यामुळे महाराष्ट्रात समर्थ आघाडी समोर येईल, असा मला विश्वास असल्याचे पाटील म्हणाले.अबू आझमी यांनी सांगितले, की आम्ही जागा मागत होतो. केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. जागा कमी दिल्या तरी चालेल पण सांप्रदायिक शक्तींना थांबवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मतांचे विभाजन होऊ देणार नाही. म्हणून आता मी फक्त तीन जागा लढवणार असल्याचे ते म्हणाले.