मुंबई- विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसघांतील पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. पदवीधर मतदारसंघातील पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या तिन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर विजयी झाले. अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला नमवत बाजी मारली. महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी एकत्रित लढत दिल्याने भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. गेल्या ५८ वर्षांपासून भाजपने राखलेल्या नागपूरच्या गडाला अखेर महाविकास आघाडीने खिंडार पाडले.
पदवीधर मतदारसंघातील तिन्ही जागा महाविकास आघाडीला
पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरुण लाड यांनी विजय मिळवला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी विजयी झाले. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतिश चव्हाण विजयी झाले. एकूणच पदवीधर मतदारसंघातील तिन्ही जागा महाविकास आघाडीला मिळाल्या असून दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला.
पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातील अंतिम निवडणूक निकाल हाती येण्यासाठी बराच काळ वाट पहावी लागली. पुणे शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार जयंत आसगावकर विजयी झाले. अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी बाजी मारली. महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले असले तरी शिवसेनेचा अमरावतीमधील उमेदवार मात्र पराभूत झाला. त्यामुळे शिवसेनेला खाते खोलता आले नाही. पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसोबतच धुळे-नंदुरबार या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोट्यातील एका जागेवरील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. तेथे भाजपचे अमरीश पटेल विजयी झाले आहेत.
पुण्याबरोबरच नागपूर पदवीधर मतदारसंघावरही भाजपचे वर्चस्व होते. नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी दमदार विजय मिळवला. भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांचा तब्बल १८,९१० मतांनी पराभव झाला. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत त्यांनी विजयासाठीचा आवश्यक कोटा पूर्ण करत भाजपच्या संदीप जोशींचा पराभव केला. गेल्या ५८ वर्षांपासून भाजपने राखलेल्या गडाला अखेर येथे खिंडार पडले आहे. पदवीधर निवडणुकीतील विजयानंतर कॉंग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांनी नागपुरातील गणेश टेकडी मंदिरात जावून सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत काही मोजके कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदारसंघांसाठी येथे चुरशी मतदान झाले. पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय झाल्याने चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात पहिल्यांदाच प्रवेश करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे. अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली तर भाजपचे संग्राम देशमुख यांना 73 हजार 321 मिळाली. विजयासाठी 1 लाख 14 हजार 137 इतक्या मतांचा कोटा होता, लाड यांनी पहिल्या पसंतीच्या मतामध्येच हा कोटा पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर विजयी झाले. शिक्षक कृती समितीचे पंढरपूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांचे विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांनी निवडणूक लढवली. आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकजुटीने केलेले प्रयत्न, पक्षाशी संबंधित शिक्षण संस्थांमधील शिक्षकांचा पाठिंबा, या जोरावर काँग्रेसने ही जागा पटकावली.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसऱ्या विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. महाविकास आघाडीमुळे फायदा झाला आणि मताधिक्य वाढले, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केले. पहिल्या फेरीपासून सतीश चव्हाण यांनी घेतलेली आघाडी पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिली. सतीश चव्हाण यांना एकूण १,१६,६३८ मते मिळाली. तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना ५८,७४३ मते मिळाली. पाचव्या फेरी अखेर सतीश चव्हाण यांना ५७,८९५ मते विजयी घोषित करण्यात आले. बारा वर्षात केलेल्या कामामुळे विजय मिळाल्याचे सतीश चव्हाण यांनी सांगितले. महाविकास आघाडीमुळे मताधिक्य वाढले असून आघाडीच्या अजेंड्यानुसार पुढील काम केले जाईल, असा विश्वास सतीश चव्हाण यांनी व्यक्त केला.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत वाशिमचे अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी बाजी मारली. या निवडणुकीत जाणकारांचे सर्व अंदाज चुकले असून मतदानाच्या दिवशीपर्यंत किरण सरनाईक हे स्पर्धेत राहतील, अशी अपेक्षाही कुणाला नसताना अतिशय नियोजनबद्ध आखणी करून किरण सरनाईक यांनी महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांचा 3 हजार 342 मतांनी पराभव करून सर्वांना चकित केले.
- धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था पोटनिवडणूक
धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था कोट्यातील विधान परिषदेच्या जागेवर महाविकास आघाडीचा करिष्मा चालला नसून सलग तिसऱ्यांदा विधानपरिषदेत जाण्याची अमरीश पटेल यांना संधी मिळाली आहे. गेल्या तीस वर्षांपासून काँग्रेसकडे असलेली विधान परिषदेची जागा भाजपने हिसकावून घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या. धुळे-नंदुरबार जिल्हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपची हवा असताना काही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. विधान परिषदेच्या इतिहासातही काँग्रेसची एकाधिकारशाही कायम होती. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसच्या हातून विधान परिषदेची जागा भाजपने हिसकावून घेतली.