मुंबई -मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने आजच्या वज्रमूठ सभेसाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे. महाविकास आघाडी ही अभेद्य असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आजच्या सभेत भाषण करणार की नाही, याबाबत राष्ट्रवादीत संभ्रम असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजित पवारांच्या भाषणाबाबत काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.
तिसरी वज्रमूठ सभा-महाविकास आघाडीची यापूर्वी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे वज्रमूठ सभा झाली होती. या दोन्ही सभांमध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकार तसेच भाजपवर सडकून टीका केली होती. त्यानंतर आज तिसरी सभा मुंबई होत आहे. या सभेला ऐतिहासिक करण्याचे प्रयत्न करून केले जाणार आहे. देशात सुरू आलेली मोदी - शाह यांची हुकुमशाही, संविधानाचे रक्षण, ५० खोके व ईडी, सीबीआय या यंत्रणांचा वापर करत राज्यात सुरू असलेले फोडा फोडीचे राजकारण या सर्व मुद्द्यांवर महाविकास आघाडीतील नेते एकत्र येऊन भाजप व शिंदे गटावर हल्लाबोल करणार आहेत.
अजित पवारांच्या भाषणाबाबत संभ्रम-उद्धव ठाकरे संभाजी नगर व नागपूर नंतर आता या सभेत काय बोलणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. या सभेला कुठल्याही पद्धतीचे गालबोट लागता कामा नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते हजर राहणार आहेत. नागपूरच्या वज्रमूठ सभेत भाषणापासून लांब राहिलेले विरोधी पक्षनेते अजित पवार आजच्या सभेत सहभागी होणार आहे. ते सुद्धा भाषण सुद्धा करणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील सभेला मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
बारसू प्रकल्पावरून मतभेद-कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटात मतभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे यांनी बारसू प्रकल्पाला जोरदार विरोध केला असला तरी याबाबत त्यांनीच मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिल्याचे समोर आल्याने त्यावर चर्चा रंगल्या आहेत. अशात अजित पवार यांनी अशा प्रकल्पांची महाराष्ट्राला गरज आहे. यात कुणीही राजकारण करू नये, अशा शब्दांत ठणकावले होते. त्यामुळे बारसू रिफायनरी प्रकल्पाबात महाविकास आघाडीचे नेते काय भूमिका मांडतात? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
Vajra Muth rally : वज्रमुठ सभेची महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी, अजित पवारांच्या भाषणाबाबत संभ्रम कायम - वज्रमुठ सभा महाविकास आघाडी
महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज महाराष्ट्र दिनी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे होत आहे. ही सभा अतिभव्य आणि रेकॉर्डब्रेक ठरणार असल्याचा दावा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. सायंकाळी ५ वाजता ही सभा सुरू होणार आहे. यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विरोध पक्षनेते अजित पवार यांची सुद्धा भाषणे होणार आहेत
कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल-बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर होणाऱ्या या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. सभेसाठी विराट संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन महाविकास आघाडीकडून मुंबईकरांना केले गेले आहे. दरम्यान, या सभेपूर्वी आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक निकालामध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. त्याचा उल्लेख करत आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, 'कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत यश प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राने पुनश्च दाखवले की येथे गद्दारीला स्थान नाही. व हेच आपल्याला येत्या लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिसणार आहे. त्यातच काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत येऊन गेल्याने त्यांच्या मुंबई भेटीमध्ये नेमकं काय दडलंय? यावरही मविआ नेते टीकाटिपणी करतील यात नवल नाही.