मुंबई - दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ५० हजार देण्याचे बोलले होते. त्याचे काय झाले? शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही काम सध्याचे सरकार करू शकत नाही. कारण यांच्या तिजोरीत पैसा नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
हेही वाचा -लसी सुरक्षित; आरोग्य कर्मचार्यांनी लसीकरणामध्ये सहभागी व्हावे - राजेश टोपे
निदान मातोश्रीतून मुख्यमंत्री बाहेर पडतील - राणे
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. एसटीचे पगार दोन, तीन महिने होत नाहीत, बेस्टचेही तसेच आहे. सरकारची अवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे, आधी ते सुधारा मग रस्त्यावर या. आमचा रस्त्यावर यायला नकार नाही. निदान मातोश्रीतून मुख्यमंत्री बाहेर तरी पडतील. पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोक मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.
धान्य आणि भाजी मातोश्रीत नेऊन विकायची का?
हे राजकीय आंदोलन असून राजकीय खेळी आहे. वर्षभरात शेतकऱ्यांच्या हिताचे एकही काम या सरकारने केलेले नाही, आता पुळका आला आहे. ते बिल शरद पवारांनी आता वाचले असेल, यापूर्वी तेच प्रयत्न करत होते. शेतकऱ्यांना माल कुठेही विकण्याची परवानगी आहे. हे चुकीचे आहे का? मग विरोध कशाला? धान्य आणि भाजी मातोश्रीत नेऊन विकायची का? तो दरवाजा, पिंजरा बंदच असतो. मग विकायचा कुठे?, अशी विचारणा नारायण राणे यांनी केली.