मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने आज महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर धडक दिली. या वादळामुळे ओढावलेल्या संकटात सापडलेल्या नागरिकांना राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदत करण्याचे आवाहन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
'राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निसर्ग चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या नागरिकांच्या मदतीला उभे राहावे'
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनापट्टी भागात राज्य शासनासह सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. मात्र, या वादळाचा वेग पाहता कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे, या वादळाच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुढे यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.
एका निवेदनात, पवार यांनी चक्रीवादळामुळे सार्वजनिक व खाजगी मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे नमूद केले. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना या घटनेने बाधित झालेल्यांना मदत करण्याचा आग्रहपूर्व आवाहन केले आहे. तर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना घराच्या आतच रहावे आणि राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.
दरम्यान, निसर्ग चक्रीवादळ हे १००, ११० आणि १२० किमी ताशीच्या वेगवान वादळासह रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर येऊन धडकले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा तडाखा बसला आहेच शिवाय मुंबई, ठाणे यांनाही फटका बसणार आहे.