मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री हे बुधवारी २३ सप्टेंबरला जळगाव दौऱ्यावर निघाले होते. मात्र, मध्येच तो दौरा अर्धवट सोडून ते मुंबईकडे रवाना झाले. राष्ट्रवादी काँग्रेसची अत्यंत तातडीची बैठक पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावली आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपातील एका बड्या नेत्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याने त्यासाठीची ही बैठक होत असल्याचे सांगण्यात येते.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे जळगाव येथे सिंचन आढावासाठी या जिल्ह्याच्या दौऱ्यावर निघाले होते. याच दौऱ्यादरम्यान जयंत पाटील याची भेट ही भाजपातील नाराज नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी ठरली होती. मात्र, या भेटीबद्दल दोन्ही नेत्यांकडून खूप गुप्तता पाळण्यात आली होती. यामुळे पाटील यांच्या जळगाव दौऱ्याची राजकीय वर्तुळात एक उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, पाटील यांचा दौरा रद्द करून ते मुंबईला पोहोचत असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात बुधवारी, २३ सप्टेंबरला मुंबई येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व नेते व पदाधिकारीही मुंबईकडे रवाना झाले आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या या तातडीच्या बैठकीत भाजप नेते एकनाथ खडसे यांना पक्षात घेण्याबाबत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची चर्चा होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठीच पवार हे राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचे मत जाणून घेण्यासाठी या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, एकनाथ खडसे हे भाजप सोडून इतर पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. काँग्रेस नेत्यांनी त्यांना आपल्या पक्षात येण्याची मोठी ऑफर दिली असली तरी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या नेतृत्ववाद आणि इतर विषयावरील गोंधळामुळे खडसे हे तिकडे जाणार नसल्याचे बोलले जाते. मात्र, राष्ट्रवादीमध्ये येण्याची त्यांची इच्छा असल्यानेच त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला राष्ट्रवादीकडून मोठी ऑफर आली होती, असे सूचक विधान केले होते. यामुळे राष्ट्रवादीच्या होत असलेल्या या बैठकीत एकनाथ खडसे यांच्या पक्षात प्रवेशाचा महत्त्वाचा मुद्दा असणार असल्याचे सांगण्यात येते.