महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जागतिक तंबाखू विरोधी दिन : आरोग्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्र 'तंबाखू मुक्त' करण्याची शपथ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि जागतिक तंबाखु विरोधी दिनाच्या दोन दिवस आधी राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान प्रतिबंध आणि थुंकण्यास बंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 'जागतिक तंबाखु विरोधी दिना'निमित्त आज (रविवारी) राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी राज्यातील जनतेला तंबाखु मुक्तीची शपथ देतानाच महाराष्ट्र तंबाखु मुक्त करण्याचीही शपथ घेतली.

Rajesh Tope, Health Minister
राजेश टोपे, आरोग्यमंत्री

By

Published : May 31, 2020, 4:57 PM IST

मुंबई - 'जागतिक तंबाखू विरोधी दिना'निमित्त आज (रविवारी) राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला तंबाखू मुक्तीची शपथ देतानाच महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचीही शपथ घेतली. राज्यात असलेल्या २२४ तंबाखू मुक्ती केंद्रांच्या माध्यमातून सुमारे साडेपाच लाख रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहितीही यावेळीआरोग्यमंत्र्यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या दोन दिवस आधी राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान प्रतिबंध आणि थुंकण्यास बंदी आदेश लागू केल्याचेही त्यांनी सांगितले.

दरवर्षी, ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेमार्फत घोषवाक्यही दिले जाते. ‘तरुणांना तंबाखू उद्योगांच्या तावडीतून वाचवा आणि त्यांना तंबाखु व निकोटीनच्या वापरापासून दूर ठेवा’ असे घोषवाक्य यावर्षासाठी देण्यात आले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात २६ हजार ४१८ शाळा आणि २४४२ आरोग्य संस्था तंबाखू मुक्त करण्यात आल्या आहेत. तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत सुमारे ६ कोटी ५४ लाख २४ हजार ४३० इतका दंड वसुल करण्यात आला आहे. २२४ तंबाखु मुक्ती केंद्राच्या माध्यमातून ५ लाख ४१ हजार ४१५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत तर २५ हजार २७५ जण तंबाखू मुक्त करण्यात आले आहेत.

जुलै २०१८ पासून राज्यात हुक्का बंदीदेखील करण्यात आली आहे. गेली चार वर्ष राज्यामध्ये मौखिक कर्करोग तपासणी शिबीरे देखील घेण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी शासकीय निवासस्थानी आरोग्यमंत्र्यांनी तंबाखू विरोधी शपथ देताना मी, माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन, अशी शपथही घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details