मुंबई - कोरोनावरील रेमडेसिवीर, टॉसिलीझुमाब या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे. तर या इंजेक्शनचा तुडवडा मोठ्या प्रमाणात आहे. या पार्श्वभूमी राज्य सरकारने 60 हजार रेमडेसीविर, 20 हजार टॉसीलीझुमाब इंजेक्शनसह सहा लाख फेवीपिरावीर गोळ्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यासाठी निविदा काढण्यात आल्याची
माहिती राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यशासनाने एकूण 20 कोटीची ही औषध खरेदी केली आहे. तर या सर्व औषधांच्या किमती निश्चित करण्यात आल्या असून याच किमतीत आता या औषधांची सरकारकडून खरेदी केली जाईल, असे ही त्यांनी सांगितले आहे.
कोरोनाबाधित असलेल्या गंभीर रुग्णांवर रेमडेसिवीर आणि टॉसिलीझुमाब हे इंजेक्शन गुणकारी ठरत आहे. तर सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना फेवीपिरावीर गोळ्या दिल्या जात आहेत. रेमडेसिवीरचे उत्पादन आतापर्यंत केवळ अमेरिकेत केले जात होते. त्यामुळे हे इंजेक्शन भारतात सहज मिळावे यासाठी सिल्पा आणि हिट्रो फार्मा कंपनीला परवानगी देण्यात आली. पण तरीही या इंजेक्शनचा पुरवठा कमी असून काळाबाजार सुरू आहे. त्याचवेळी टॉसीलीझुमाब हे केवळ जगभरात एकाच कंपनीकडून उत्पादित होते. त्यामुळे त्याचीही टंचाई असून ही दोन्ही औषधे महागडी आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता सरकारने या औषधांची खरेदी करत काळ्याबाजाराला लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे.