मुंबई- इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, या मुद्द्यावर अधिवेशनादरम्यान विधानसभेत गदारोळ झाला. या गदारोळात भारतीय जनता पक्षाचे 12 आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले. या निलंबनानंतर तालिका अध्यक्ष असल्याने भास्कर जाधव यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी दिली जात असल्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेत सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणाऱ्या धमकीमुळे भास्कर जाधव यांना सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी विधानसभेत केली होती. तर या मागणीनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भास्कर जाधव यांना सुरक्षा दिली जाणार असल्याचे सांगितले.
मला सुरक्षेची गरज नाही - जाधव
आमदार म्हणून सामाजिक जीवनात काम करत असताना अनेक उतार-चढाव राजकीय जीवनात आपण पाहिलेले आहेत. हे उतार-चढाव होत असताना, राज्य सरकारने नेहमीच मला सुरक्षा पुरवली आहे. मात्र, राज्य सरकारने सांगूनही मी कधीही सुरक्षा घेतलेली नाही. त्याचप्रकारे आताही मला सुरक्षा नको, असे भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष असताना सभागृहात मत व्यक्त केले. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता राज्य सरकारला जर, वाटत असेल भास्कर जाधव यांना सुरक्षा दिली गेली पाहिजे. तर, ती सुरक्षा मी घेईल असेही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.