मुंबई -एचव्हीडीएस अंतर्गत खानापूर तालुक्यातील नवीन वीज जोडण्यांची कामे येत्या जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. तसेच 600 मीटरपेक्षा अधिक लांबीवर वीजजोडणी असेल तर वाढीव खर्च जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यासाठी प्रस्ताव द्या, असे निर्देशही त्यांनी दिले.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज (मंगळवारी) सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदार संघातील ऊर्जा विभागाच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी आमदार अनिल बाबर, महावितरणचे संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगेरी यावेळी उपस्थित होते. तर पुणे विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.
ऊर्जामंत्री यावेळी म्हणाले, ओव्हरलोडिंगमुळे रोहित्रे नादुरुस्त होण्याची समस्या दूर करण्यासाठी ओव्हरलोड झालेल्या रोहित्राशेजारी नवीन रोहित्र उभारण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. जिल्ह्यातील नवीन वीजजोडणीची प्रकरणे (पेड पेंडिंग) मार्गी लावण्यासाठी स्वखर्चाने तसेच डीपीडीसीच्या निधीतून रोहित्रे उभारणी करू इच्छिणाऱ्यांना रोहित्रे उभारून देण्यात येतात. तथापि, याव्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात वीज जोडणीचे अर्ज प्रलंबित आहेत. ते प्रस्तावित नवीन कृषी वीज धोरणात मार्गी लागतील, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर महावितरणमधील 3 हजार 500 पदांच्या भरतीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. तर मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबावे लागले आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. तर एचव्हीडीएस अंतर्गत वीज जोडणीची कामे झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांना वीज पुरवठा मिळणे अधिक खात्रीशीर होण्यासह वीजपुरवठा गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होईल.
खानापूर मतदारसंघात नवीन उपकेंद्र उभारणीचे प्रस्ताव मार्गी लावावेत, 4.5 मेगावॅट सौरऊर्जेचे प्रकल्प उभारण्यासाठी जागा उपलब्धतेचे काम मुख्यत्वे मार्गी लावले आहे, तरी या कामांच्या प्रस्तावाला गती द्यावी, अशा मागण्या आमदार अनिल बाबर यांनी यावेळी केल्या. तर याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे ऊर्जामंत्री राऊत यांनी सांगितले.