मुंबई - राज्याचा 2021-22 या आगामी आर्थिक वर्षाचा 3 लाख 47 हजार 457 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. 1 लाख 30 हजार कोटी इतकी यात तूट दर्शवली आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा परिणाम झाल्याने यंदा नव्या प्रकल्पांची कोणतेही घोषणा केलेली नाही. मात्र, मद्यावर पाच टक्के मुल्यवर्धीत कर आकारुन मद्यपींना दणका दिला आहे. तर आरोग्य, शेतकरी, महिला, शिक्षणासाठी विशेष निधींची तरतूद करुन पर्यटन आणि राज्याच्या धार्मिक वास्तूंचे जतन आणि संवर्धनावर सरकारने विशेष भर दिल्याचे अर्थसंकल्पातून दिसून येते.
आरोग्य विभागासाठी भरघोस निधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा आज (दि. 8 मार्च) दुसरा अर्थसंकल्प सादर केला. विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेत शंभूराजे देसाई यांनी मांडला. कोरोना काळात औद्यगिक अर्थव्यवस्था ढासळल्यानंतर कृषी क्षेत्राने राज्याच्या अर्थव्यवस्थेला सावरले, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी विधानसभेत स्पष्ट केले. तसेच आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी 7 हजार 500 कोटींचे प्रकल्प येत्या चार वर्षात पूर्ण केले जाणार आहे. राज्यातील 150 रुग्णालयात कर्करोग निदान सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये दर्जेदार आरोग्य सेवांसाठी येत्या 5 वर्षात 5 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन दिले जातील. त्यापैकी 800 कोटी रुपये यंदा दिल्याचे अर्थमंत्री पवार यांनी सांगितले. तसेच सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड आणि सातारा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, अमरावती व परभणी येथेही वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केले जातील. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न 11 शासकीय परिचर्या विद्यालयांचे महाविद्यालयांमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. 17 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना जोडून भौतिकोपचार व व्यवसायोपचार महाविद्यालयांची स्थापना केली जाणार आहे. जिल्हा रूग्णालयामध्ये व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये, “पोस्ट कोविड काउन्सिलींग व ट्रीटमेंट सेंटर” उभारले जातील. सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 8 हजार 955 कोटी 29 लाख रुपये तर वैद्यकीय शिक्षण विभागासाठी 1 हजार 941 कोटी 64 लाख रुपयांची तरतूद केल्याचे अर्थमंत्री म्हणाले.
धार्मिक स्थळांचे जतन आणि संवर्धन
राज्यात प्राचीन कलेचा वारसा लाभलेल्या धार्मिक स्थळांचे जतन व संवर्धनाकडे महाविकास आघाडीने अर्थसंकल्पांतून लक्ष वेधले आहे. परळी येथील श्री क्षेत्र परळी वैजनाथ, हिंगोलीतील श्री क्षेत्र औंढा नागनाथ, नाशिकमधील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, पुणे येथील श्री क्षेत्र भीमाशंकर या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. तसेच पुण्यातील श्री क्षेत्र जेजुरी गड, श्री क्षेत्र बिरदेव देवस्थान, श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील आरेवाडी या तीर्थक्षेत्रांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठीही निधी उपलब्ध करणार असल्याची ग्वाही अर्थमंत्र्यांनी दिली आहे. अमरावती येथील श्री क्षेत्र मोझरी आणि श्री क्षेत्र कौंडण्यपूर, वलगांवमधील संत गाडगेबाबा निर्वाण भूमी येथेही मूलभूत सुविधा आराखड्यांसाठी निधी उपलब्ध करुन दिली जाईल. नाशिकमधील श्री क्षेत्र सप्तश्रृंगी गड, संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर, अहमदनगर पार्थडी येथील श्री क्षेत्र भगवानगड, बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायण गड आणि श्री क्षेत्र गहिनीनाथ गड या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधी उपलब्ध केला जाईल. मोरगाव, थेऊर, रांजगणगाव, ओझर, लेण्याद्री, महाड, पाली तसेच सिद्धटेक या श्रध्दास्थानांच्या विकासासाठी “अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत” निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. हिंगोली मधील संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थान श्री क्षेत्र नरसी नामदेव या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. संत बसवेश्वर महाराज यांच्या स्मरणार्थ मंगळवेढा (जि.सोलापूर) येथे स्मारक उभे करण्यासाठी सन 2021- 22 मध्ये आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. वाशिम येथील श्री क्षेत्र पोहरादेवी मंदिराच्या विकास आराखड्याची कामे पूर्ण, करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करणार असल्याची माहिती अर्थमंत्री पवार यांनी दिली.
प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन
राज्यातील रत्निगिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील धुतपापेश्वर मंदिर, कोल्हापूर शिरोळमधील कोपेश्वर मंदिर, कार्ल्यातील एकविरा माता मंदिर, नाशिकच्या सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर, औरंगाबाद येथील खंडोबा मंदिर, बीडमधील भगवान पुरुषोत्तम मंदिर, अमरावतीमधील आनंदेश्वर मंदिर, गडचिरोलीच्या मार्कंडा येथील शिव मंदिर या मंदिरांच्या जतन व संवर्धन करण्यासाठी 101 कोटी रुपये अनुदान दिले जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटन स्थळे बनवणार
जव्हार येथे गिरीस्थान पर्यटनस्थळ विकसित करण्यात येणार आहे. वरळी दुग्धशाळेच्या 14 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन संकुलाच्या निर्मितीसाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रिया व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. पुण्यातील साखर संकुलात सुमारे 40 कोटी रुपये खर्चून साखर संग्रहालय उभारण्याचे प्रस्तावित आहे.
कृषी विकासाला गती देणार
चार लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा केला जाईल. तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना घोषित केल्या आहेत. शेतकऱ्यांना कृषीपंप वीज जोडणी देण्यासाठी महावितरण कंपनीला दरवर्षी 1 हजार 500 कोटी रुपये भागभांडवल निधी दिला जाणार आहे. थकीत वीजबिलात शेतकऱ्यांना 33 टक्के सूट, ऊर्वरित थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा भरणा मार्च 2022 पर्यंत केल्यास राहिलेल्या 50 टक्के रकमेची अतिरीक्त माफी, 44 लाख 37 हजार शेतकऱ्यांना मूळ थकबाकी रकमेच्या 66 टक्के, 30 हजार 411 कोटी रूपये रक्कम माफी देणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पवार यांनी केली. तसेच शेतमालाच्या बाजारपेठ व मूल्यसाखळ्यांच्या निर्मितीसाठी एकूण 2 हजार 100 कोटी रुपये अंदाजित किंमतीचे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प सुरू करणार असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक तालुक्यात किमान एक याप्रमाणे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करणार आहे. राज्यातील 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी येत्या 3 वर्षात 600 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला जाईल. शरद पवार ग्राम समृध्दी योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशींचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळीपालन किंवा कुकुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसेच कंपोस्टींगसाठी अनुदान दिले जाणार आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागास 3 हजार 274 कोटी रुपये देणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
जलसंपदा
राज्यात जलसंपदा विभागाची 278 कामे सुरू आहेत. 26 लाख 88 हजार 576 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होईल. यातून 8 हजार 470 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा उपलब्ध होणार आहे. प्रधानमंत्री कृषी योजनेतून 26 प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत. 2021-22 वर्षात 26 पैकी 13 प्रकल्पांचे काम मार्गी लागेल. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 91 प्रकल्प कामे हाती घेतली असून येत्या वर्षभरात 19 प्रकल्प पूर्ण झाल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला आहे. राज्यातील संपूर्ण जलसंपदा विभागासाठी 12 हजार 951 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद प्रस्तावित आहे.
मदत व पुनर्वसन
मदत व पुनर्वसन विभागास 11 हजार 454 कोटी 78 लाख 62 हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे. अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी या अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती व कल्याणकारी योजनाबरोबरच पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे.
रस्ते विकास
नांदेड ते जालना या दोनशे किलोमीटर लांबीचे 7 हजार कोटी रूपये अंदाजित रकमेचे द्रुतगती जोड महामार्गाचे नवीन काम हाती घेतले जाणार आहेत. पुण्याबाहेरून चक्राकार मार्गाची (रिंग रोड) उभारणी केली जाईल. 170 किलोमीटर लांबीच्या 26 हजार कोटी रूपये अंदाजित किंमत असणार आहे. रायगड जिल्ह्यातील रेवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी या 540 किलोमीटर लांबीच्या सागरी मार्गाच्या कामासाठी 9 हजार 573 कोटी खर्च अपेक्षित आहे. ग्रामीण सडक विकास योजनेअंतर्गत ग्रामीण रस्ते विकासाची 40 हजार किलोमीटर लांबीची कामे हाती घेण्यात येणार आहे. तसेच 10 हजार किलोमीटर लांबीची कामे यावर्षी 1 हजार 700 कोटी रुपयाची तरतूद केली जाणार आहे.
रेल्वे विकास
पुणे-नाशिक या मध्यम अतिजलद रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यास मान्यता. प्रस्तावित लांबी 235 किलोमीटर, गती 200 किलोमीटर प्रतितास 16 हजार 39 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या जुन्या बसेसचे सीएनजी व विद्युत बसेसमध्ये रूपांतर व बसस्थानकांचे आधुनिकीकरणासाठी 1 हजार 400 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
ग्रामविकास
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व शबरी घरकूल योजनांसाठी 6 हजार 829 कोटी 52 लाख रूपये उपलब्ध करुन देण्यात येतील.