मुंबई : हिंदी चित्रपट निर्माता मधू मंटेना वर्मा याचे नाव अमली पदार्थांच्या संदर्भात पुढे आले होते. यानंतर, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) त्याला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले असता निर्माता मधू वर्मा हा बुधवारी चौकशीसाठी हजर झाला आहे. सोबतच, टीव्ही कलाकार अबिकल पांडे व सनम जोहर या दोघांनाही एनसीबीकडून समन्स बजावण्यात आले आहे.
अमली पर्दार्थांच्या संदर्भात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. क्वान कंपनीचे मॅनेजर असलेल्या जया साहा हिच्या व्हाट्सअॅप चॅटमध्ये मधू मंटेना वर्मा हा जया साहा हिच्याकडे गांजासारख्या अमली पदार्थाची मागणी करत असल्याचे आढळले होते. एनसीबीने रिया चक्रवर्ती व शोविक चक्रवर्ती यांच्या केलेल्या चौकशीत ती मधू वर्मा या निर्मात्याला अमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे एनसीबीकडून बॉलिवूड चित्रपट क्षेत्रातील काही दिग्गज मंडळींना चौकशीसाठी समन्स बजावण्यात येणार आहेत. आतापर्यंत काही अभिनेत्रींची नावं समोर आलेली असून त्यांनासुद्धा लवकरच यासंदर्भात चौकशीसाठी समन्स बजावण्यात येणार आहेत.
मधू मंटेना वर्मा व जया साहा यांची एनसीबीच्या कार्यालयात समोरासमोर बसवून बुधवारीचौकशी करण्यात येत आहे. याबरोबरच टीव्ही सीरियल कलाकार अबिकल पांडे व सनम जोहर या दोघांची नावे अमली पदार्थांच्या संदर्भात समोर येत असल्याने या दोघांना एनसीबीने समन्स बजावले आहेत. या दोघांच्या घरी एनसीबीने छापा टाकून घराची झडती घेतल्याचेही समोर येत आहे.