मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील वक्तव्यामुळे राज्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. त्याचा विपरित परिणाम राज्यात नवी गुंतवणूक येण्यावर आणि रोजगारावर होणार असल्याची टीका भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज्याची आर्थिक परिस्थिती, हे मोठे आव्हान असून पैशांचे सोंग करता येत नाही, अशी हतबलता व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर भांडारी यांनी टीका केली आहे.
राज्यात नवी गुंतवणूक येण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे सबळ व सक्षम चित्र निर्माण होणे गरजेचे आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हतबलता व्यक्त करतात. 2014 ला केंद्रात आणि राज्यात परिवर्तन झाल्यानंतर चुंबकीय शक्ती निर्माण झाली आणि राज्यात मोठ्या प्रमाणात नवे उद्योग येण्यासाठी एमओयू झाले, असे त्यांनी मुलाखतीत मान्य केले. पण, उद्योग परत गेले असे सांगून त्यांनी आपल्याच शिवसेनेकडे असलेल्या उद्योग खात्याचे अपयशही सांगितले आहे. एमआयडीसी ओस पडल्या आहेत, असे ते म्हणतात. त्यावेळीही त्यांच्या पक्षाचे नेते सुभाष देसाई उद्योगमंत्री म्हणून 5 वर्षे पूर्ण अपयशी ठरल्याचेच ते कबूल करतात. असे निराशाजनक आणि हतबल चित्र मुख्यमंत्रीच मांडत असताना राज्यात नवी गुंतवणूक कशी येणार? असा सवाल भांडारी यांनी केला.
हेही वाचा - शेलारांच्या वक्तव्यावर शिवसैनिक आक्रमक; भाजप प्रदेश कार्यालयाबाहेरच लावले वादग्रस्त होर्डिंग