मुंबई- म्हाडाच्या नाशिक मंडळाने याआधी 24 घरांची लॉटरी जाहीर केल्यानंतर आता पुन्हा 639 घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. नाशिक आणि श्रीरामपूर (अहमदनगर) येथील ही घरे असून या घरांसाठी लॉटरी होणार नाही. तर या घरांसाठी अर्ज मागवत जो अर्जदार प्रथम येईल त्याची पात्रता निश्चित करत पात्र अर्जदाराला घर दिले जाणार आहे. मात्र, त्याचवेळी पात्र अर्जदाराला घराची एकूण रक्कम एकाचवेळी द्यावी लागणार आहे.
गुड न्यूज..! नाशिक मंडळाचा 639 घरांचा धमाका, आता होणार थेट विक्री
म्हाडाच्या नाशिक मंडळाने याआधी 24 घरांची लॉटरी जाहीर केल्यानंतर आता पुन्हा 639 घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. नाशिक आणि श्रीरामपूर (अहमदनगर) येथील ही घरे असून या घरांसाठी लॉटरी होणार नाही. तर या घरांसाठी अर्ज मागवत जो अर्जदार प्रथम येईल त्याची पात्रता निश्चित करत पात्र अर्जदाराला घर दिले जाणार आहे.
म्हाडाच्या घरांची विक्री ही लॉटरी पद्धतीने होते. घरांसाठी अर्ज मागवत त्यांची लॉटरी काढली जाते. पण, या 639 घरांसाठी मात्र नियम आणि अटी शिथिल करत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वाने घराची विक्री नाशिक मंडळ करणार आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी नाशिकमधील मखमलाबाद येथील ८३, आडगाव येथील ९०, पाथर्डी शिवारातील ९५, म्हसरूळ येथील २१ घरांचा समावेश आहे. तर अल्प उत्पन्न गटासाठी नाशिक मधील आडगाव येथे ७६, रेल्वे लाईनजवळ पंचक येथे ६६ घरे आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील बोरावके नगर जवळ टू बीएचकेच्या ७७, वन बीएचकेच्या ६१ घरे आणि वन आरकेच्या २ सदनिका उपलब्ध आहेत. तर अत्यल्प उत्पन्न गटासाठी नाशिकमधील आडगाव येथे वन बीएचकेच्या ६७ व वन आरकेची १ सदनिकेचा समावेश आहे.
या घरांसाठी आजपासून अर्जविक्री सुरू झाली आहे. नाशिक मंडळाच्या गृहनिर्माण भवन, गडकरी चौक येथील कार्यालयातील मिळकत व्यवस्थापन विभागामध्ये अर्जविक्री-स्वीकृती केली जात आहे. तर नाशिकमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्या मुंबईकरांना म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात जनसंपर्क विभाग, कक्ष क्र. २० मध्ये ही अर्ज विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दरम्यान, या योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी 'म्हाडा'च्या https://mhada.gov.in अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल.
या योजनेतील काही सदनिका नियमानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जाती आणि विमुक्त जाती या प्रवर्गासाठी राखीव आहेत. आरक्षित गटातील अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. आरक्षणाचा तपशील अर्ज विक्रीच्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी पाच हजार रुपये, अल्प उत्पन्न गटासाठी दहा हजार रुपये, मध्यम उत्पन्न गटासाठी पंधरा हजार रुपये अनामत रक्कम आकारली जाणार आहे. या घरांच्या किमती 6 लाखांपासून 23 लाखांपर्यंत आहेत.