मुंबई - विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनावर विधानपरिषदेत शोक प्रस्ताव संमत करण्यात आला. देशमुख यांनी संसदीय कामकाजाची उंची वाढविण्यापासून ते त्यांनी अनेक नवीन आमदारांना केलेल्या मार्गदर्शना बद्दलच्या आठवणीने आज विधानपरिषदेतील दोन्ही बाजूचे सदस्यांना गहिवरून आले.
देशमुख यांनी केलेल्या संसदीय योगदानाची माहिती पुढील पिढीला व्हावी, यासाठी त्यांच्या नावाचे एखादे दालन अथवा त्यांच्या गाजलेल्या भाषणाचे डिजिटल संग्रह करावा, अशा अनेक मागण्या सदस्यांनी देशमुख यांच्यावरील शोक प्रस्तावादरम्यान मांडल्या.
सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी माजी सभापती शिवाजीराव देशमुख आणि माजी विधानपरिषदेचे सदस्य कृष्णराव पांडव यांच्या निधनावरील शोक प्रस्ताव मांडला. त्याला विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी अनुमोदन दिले. त्यावर मुंडे यांच्यासह काँग्रेसचे शरद रणपिसे, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, शेकापचे जयंत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, पीआरपीचे जोगेंद्र कवाडे, प्रसाद लाड, आनंदराव पाटील, विक्रम काळे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
काँग्रेसचे शरद रणपिसे म्हणाले की, शिवाजीराव देशमुख हे व्यक्तिमत्त्व खूप आकर्षक होते. इंदिरा गांधी यांच्याबद्दल ममत्व होते, इंदिरानिष्ठ पांडव म्हणून ओळख होती सर्वसामान्यांची दुःखे ती ओळखत होते. देशमुख इथेच आहेत, असे आम्हाला जाणवते. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या परंपरेतील ते शेवटचा दुवा होते. ते सुरुवातीला प्रशासकीय सेवेत होते. कोयनेचा भूकंप झाला त्यावेळी त्यांनी शासन व्यवस्थेचे काम उत्तमरित्या पार पाडले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जवळपास १० वर्षे डायलिसिस करून ते सभागृहाचे कामकाज चालवत होते. १९८५ ते विधानसभेत आले होते. देशमुख विचाराने गांधीवादी आणि वसंतदादा पाटील यांचे जवळचे असल्याचीही आठवण रणपिसे यांनी सांगितली.