मुंबई -कोरोना संक्रमणाचा फटका हा समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना बसला आहे. विशेष करून रेल्वे प्रवाशांच्या सामानाची ने-आण करणाऱ्या रेल्वे हमाल मजुरांवर तर सध्या दिवस काढणे कठीण होऊन बसले आहे. अशातच दुष्काळात तेरावा महिना म्हणावा म्हणून की काय? तर रेल्वेतील हमालांच्या जागी एका खासगी कंपनीने शिरकाव करण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे रेल्वे हमालांचा या गोष्टीला विरोध होत आहे.
कोरोणामुळे हमलांच्या उत्पन्नात घट
रेल्वेला सर्वाधिक महसूल देणाऱ्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात रेल्वेच्या सर्वाधिक एक्सप्रेस गाड्या ये-जा करत असतात. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर येणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांच्या भरोशावर ९२ हमालांचे कुटुंब जगत आहे. दिवसभरात येणाऱ्या प्रवाशांच्या सामानाची ओझी वाहून येथील हमाल एरवी दिवसाला 500 रुपयांची कमाई करत होते. मात्र, कोरोणा संक्रमण असल्यामुळे अगोदर पेक्षा कमी प्रमाणात रेल्वे गाड्या धावत असल्याने सध्या या हमालांच्या कमाईवर परिणाम झाला आहे.
रेल्वे स्थानकावर ट्रॉली देण्याचा खासगी कंपनीचा प्रस्ताव
मुंबईत असलेल्या विमानतळावर प्रवाशांसाठी ज्या प्रकारच्या सामानवाहू ट्रॉली मिळतात तशाच प्रकारच्या ट्रॉली मुंबईतील महत्वाच्या रेल्वेस्थानकांवर देऊन या ठिकाणी सध्या कार्यरत असलेल्या हमाल मजुरांना एका खासगी कंपनीद्वारे नोकरी देण्याची तयारी दाखवली जात आहे. मात्र, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सध्या काम करत असलेल्या 92 मजूर हमालांनी या खासगी कंपनीला विरोध दर्शवला आहे.
खासगी कंपनीमुळे हक्काच्या कमाईला मुकण्याची भीती
गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसवर हमालीचे काम करत असलेल्या मंगेश आव्हाड यांनी म्हटले की, कोरोना संक्रमणामुळे अगोदरच रेल्वे हमालांचा व्यवसाय ठप्प पडला असून मुलांचे शिक्षण, घराचे भाडे, आई-वडिलांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च भागवता भागवता त्यांच्या नाकी नऊ आले आहे. अशात एका खासगी कंपनीकडून रेल्वेला हमालांच्या जागी प्रवासी ट्रॉली देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्यामुळे आमच्या उपजीविकेवर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले.
मनोहर पूजा आंधळे यांचे वडीलसुद्धा छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसवर हमालीचे काम करत होते. मात्र, आता एका खासगी कंपनीकडून रेल्वे हमालांच्या जागी प्रवाशांना ट्रॉलीज देऊन त्यांची रोजीरोटी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आंधळे यांनी म्हटले. काही झाले तरी एका खासगी कंपनीकडून रेल्वेला देण्यात आलेल्या प्रस्तावाच्या विरोधात आम्ही उभे असून, रेल्वेच्या विविध विभागाला पत्रव्यवहार करून अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव मान्य करू नये, अशी विनंती केल्याचे त्यांनी म्हटले.
हेही वाचा -पोलिसांच्या भोंगळ कारभारावर मुंबईतील उच्च न्यायालयाचे ताशेरे
या अगोदर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान सीएसएमटीवरील हमाल मजुरांचे हाल सुरू झाले होते. मात्र, त्यावेळेस कुठलेही काम नसल्याने बहुतांश हमालांनी आपल्या गावाची वाट धरली होती. तर, काहींनी रेल्वे सुरू होईल म्हणून मुंबईतच थांबणे पसंत केले होते. मात्र, आता टप्प्याटप्प्याने रेल्वेसेवा बहाल करण्यात आली असली तरी रेल्वेच्या संख्येत वाढ करण्यात आली नसल्यामुळे दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न पडला असल्याचे आंधळे यांनी सांगितले. खासगी कंपनीकडून रेल्वेला असा प्रस्ताव जात असेल तर पुढे काय करायचे? असा प्रश्न ही त्यांना सतावत आहे.
हेही वाचा -मुलुंडमध्ये कोरोना नियम मोडणाऱ्या हॉटेल चालकावर कारवाई