मुंबई -ऐरोली व बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघाचे काल निकाल हाती आले. निकाल तसे पाहिले तर धक्कादायक नव्हते. कारण दोन्ही मतदारसंघात भाजपच्या दोन्ही उमेदवारांसमोर सक्षम व ओळखीचे चेहरे नसल्याने हे यश भाजपच्या पारड्यात पडले असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - 'रोहित आणि राम शिंदेंची भेट हे सुसंस्कृत राजकारणाचे लक्षण'
गणेश नाईकांनी राष्ट्रवादी सोडून भाजप प्रवेश केल्यानंतर नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला उतरती कळा लागली. आमच्यासाठी गणेश नाईक हाच एक पक्ष असे सांगणाऱ्या कार्यकर्त्यांनी नाईकांच्या पाठीमागे भाजपमध्ये प्रवेश केला. नाईक यांनी राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांसोबत भाजपमध्ये प्रवेश केल्याने नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले. त्यामुळे नवी मुंबईत भाजप किंवा शिवसेना उमेदवारी कोणाला देणार यावर जोरदार चर्चा सुरू होती.नवी मुंबईतल्या दोन्ही मतदारसंघात भाजपचे पारडे जड असल्याने ऐरोली व बेलापूर मतदारंसघात भाजपचे उमेदवार उभे करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत ऐरोली मतदारसंघात कोणतेही विशेष ओळखीचे चेहरे नसल्याने गणेश नाईक यांना 1 लाख 14 हजार 38 मते मिळाली. निलेश बाणखिले व गणेश शिंदे हे चेहेरे जनमाणसात नवीन होते. 75 हजार 448 अधिक मत मिळवून गणेश नाईक ऐरोली मतदारसंघातून विजयी झाले.
बेलापूर मतदारसंघातही मंदा म्हात्रे यांच्या विरोधात विशेष ओळखीचा चेहरा नव्हता. मनसेचे गजानन काळे आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास अपयशी ठरले. तर अशोक गावडे यांनाही काही वैयक्तिक कारणामुळे मतदारांनी नाकारले. विशेषतः 3 हजार 799 इतकी मते नोटाला मिळाली. बेलापूर मतदारसंघातील मतदारांची नाराजी दिसून आली. 87 हजार 746 मते मंदा म्हात्रे यांना मिळाली. 43 हजार 549 मते अधिक मिळाल्याने मंदा म्हात्रे या विजयी झाल्या.