मुंबई : अजित पवार मंत्रीमंडळात सामिल झाल्यानंतर राज्यातील नेत्यांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तसेच सप्टेंबर महिन्यात राज्यातील मुख्य खुर्ची (मुख्यमंत्री) बदलण्यात येणार असल्याचे खळबळजनक विधानही वडेट्टीवार यांनी केलंय. ते शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
पुढच्या काही दिवसात मुख्य खुर्ची बदलणार : 'तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांच्यात तीन तिघाडा अन् काम बिघाडा होतोय. एका कार्यक्रमात सरकारचे दोन उपमुख्यमंत्री एकत्र येत नाहीत', असे विजय वडेट्टीवार म्हणाले. 'राज्यातील सत्ताकारणात फक्त आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पुढच्या काही दिवसात मुख्य खुर्ची बदलली जाणार', असे दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
कर्नाटकातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद : कर्नाटकातल्या बागलकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून नवा वाद निर्माण झालाय. येथील महाराजांचा पुतळा पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आलाय. आता त्यावरून राज्यातील राजकारण तापलंय. या वादाला महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाची पार्श्वभूमी देखील आहे. या मुद्यावरून बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ, जमखंडी, बेगी बदामी या तालुक्यात बंद पाळण्यात येतोय. यापूर्वी बेंगलोरमध्ये देखील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. तसेच हुक्केरी तालुक्यातील मनगुती येथे महाराजांचा पुतळा हटवण्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे आता कर्नाटकाला महाराजांच्या प्रतिमेचं काय वावडं आहे, असा प्रश्न सीमावर्ती भागातील नागरिक विचारत आहेत.
शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृत होता - वडेट्टीवार : या वादावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका मांडली. बागलकोटमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अनधिकृत होता, त्यामुळे तो हटवण्यात आल्याचा अजब दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय. कर्नाटकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याबद्दल भाजपा नेते वाद घालत आहेत, मात्र ते राज्यातील स्थितीवर बोलत नसल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.
हे ही वाचा :
- Vijay Wadettiwar On CAG Report : नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी कॅग अहवालात ताशेरे - विजय वडेट्टीवार
- Nitin Gadkari : नितीन गडकरींना बाजूला करण्याचा मोदींचा प्रयत्न, दिली होती 'ही' ऑफर
- Belgaum bifurcation issues : बेळगाव विभाजनाचा प्रस्ताव, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा तापणार