महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोणार सरोवराच्या गुलाबी पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले - वनमंत्री संजय राठोड

लोणार सरोवरातील पाण्याचा रंग का बदलला? याची तपासणी करण्यासाठी पाण्याचे नमुने खास दुतामार्फत नागपूर येथील नीरी संस्थेकडे तसेच पुणे येथील आगरकर संशोधन संस्थेकडे पाठविले आहे.

lonar lake pink water
लोणार सरोवराच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले

By

Published : Jun 12, 2020, 7:43 PM IST

मुंबई- बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे वन विभागाच्या अखत्यारीत आहे. 9 जून रोजी लोणार सरोवराचे पाणी गुलाबी रंगाचे झाल्याची घटना घडली. या पाण्याचे शास्त्रीय पद्धतीने नमुने घेण्यात आले आहे. नमुने संशोधनासाठी नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) तसेच पुणे येथील आगरकर संशोधन संस्थेकडे पाठविण्यात आल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

लोणार सरोवर हे उल्कापाताने तयार झालेले असून ते जगातील वैशिष्टपूर्ण सरोवर आहे. या सरोवरातील पाण्यात क्षाराचे प्रमाण जास्त आहे. सरोवरातील पाण्यात विशिष्ट प्रकाराच्या हॅलो बॅक्टेरीया व शेवाळाच्या संयोगातून अशा प्रकारचे गुलाबी रंगाचे पाणी होत असावे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे, तर काही तज्ज्ञांनी डुनलेलीया अल्गी (Dunaliella algae) व हॅलो बॅक्ट्रेरीया (Halo Bacteria) या जीवाणूमुळे बीटा कॅरोटीन रंगद्रव्य निर्माण झाल्याने लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग गुलाबी होत असल्याचे मत व्यक्त केले. इराणमधील क्षारयुक्त सरोवरात अशा प्रकारे रंगात बदल झाल्याच्या घटना यापूर्वी झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चौकशी करण्यात येत असून अन्य कुठल्याही कृत्रिम घटकामुळे पाण्याचा रंग बदललेला नाही, अशी माहितीही वनमंत्री राठोड यांनी दिली.

अकोला येथील वन्यजीव विभागाने लोणार सरोवराच्या पाण्याचे शास्त्रीय पद्धतीने नमुने घेण्यासाठी शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयचे डॉ. मिलींद शिरभाते यांना लोणार येथे पाठविले होते. त्यांनी गुलाबी रंगाच्या पाण्याचे व मातीचे नमुने गोळा करून वनविभागाकडे सादर केले आहे. पाण्यातील रंगबदल तपासासाठी सदर नमुने खास दुतामार्फत नागपूर येथील नीरी संस्थेकडे तसेच पुणे येथील आगरकर संशोधन संस्थेकडे पाठविले आहेत.

बुलडाणा शहराच्या दक्षिण पूर्व (आग्नेय) दिशेला 90 किमी अंतरावर लोणार गावालगत उल्कापातामुळे तयार झालेले एकमेव सरोवर आहे. हे सरोवर लोणार अभयारण्यांतर्गत येते. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील अतिवेगवान उल्का जमिनीवर धडकल्याने तयार झालेले जगातील तिसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची 464.63 मीटर असून खोली 150 मीटर आहे. त्याचा आकार अंडाकृती असून पूर्व-पश्चिम व्यास 1787 मीटर, तर उत्तर-दक्षिण व्यास 1875 मीटर आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details