मुंबई Lok Sabha Elections : पत्रकार परिषदेत बोलत असताना अजित पवार म्हणाले की, "येणाऱ्या निवडणुकीमध्ये देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना विराजमान करायचंय. त्यासाठी देशात एनडीए आणि महाराष्ट्रातून महायुतीच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, यावर भर दिला जाईल. येणाऱ्या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाणार आहोत, असंही ते म्हणाले. तसंच आजच्या बैठकीत संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या फिल्डवरील अडीअडचणी समजून घेतल्या. नागपूरचं अधिवेशन आटोपल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवून संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं जातंय. मात्र, पवार कुटुंबात कोणत्याही प्रकारची फिक्सिंग नाही" असं यावेळी अजित पवारांनी स्पष्ट केलंय.
जयंत पाटलांच्या टीकेलाही दिले प्रत्यूत्तर :काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील भोपाळ इथं एका भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. याचाच संदर्भ देत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली. यावर प्रतिक्रिया देत अजित पवार म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना हे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर कितीतरी श्वेतपत्रिका निघाल्या, चौकश्या झाल्या, पण काही झालं नाही. तसंच मी पुण्याचा पालकमंत्री आहे. मी एक टक्का जरी घेतला असेल तर सिद्ध करा, मी राजकारण सोडेल."