महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टूथब्रश, चप्पल, बुट, मोजे, उशी...तुमच्या मतदान यंत्रावर असू शकतात ही चिन्हे

यामध्ये शेती आणि शेतकऱ्याला मान देणाऱ्या चिन्हांचाही प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. या चिन्हांमध्ये ऊस शेतकरी, नारळाची बाग, डिझेल पंप, ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, शेतीच्या मशागतीसाठीचे टीलर, विहीर अशा चिन्हांचा समावेश असून एकप्रकारे शेतीला सन्मान देण्याचा प्रयत्न यामधून केला आहे.

By

Published : Apr 2, 2019, 12:14 PM IST

Updated : Apr 2, 2019, 5:32 PM IST

लोकसभेसाठी १९८ मुक्त चिन्ह घोषित

मुंबई - लोकसभा निवडणुका लढविणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षातील उमेदवार वगळता अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी चिन्ह (निशाणी) चे वाटप करण्यात आले. यंदा यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. 198 निवडणूक चिन्हे ‘मुक्त चिन्हे’ घोषित करण्यात आला आहेत.


यामध्ये शेती आणि शेतकऱ्याला मान देणाऱ्या चिन्हांचाही प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. या चिन्हांमध्ये ऊस शेतकरी, नारळाची बाग, डिजेल पंप, ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, शेतीच्या मशागतीसाठीचे टीलर, विहीर अशा चिन्हांचा समावेश असून एकप्रकारे शेतीला सन्मान देण्याचा प्रयत्न यामधून केला आहे.

राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांची चिन्हे राखीव आहेत. 2014 च्या निवडणुकांमध्ये 87 मुक्त चिन्हे होती. त्यापैकी काही चिन्हे वगळून आणि नव्याने समावेश करुन यावर्षी 198 मुक्त चिन्हे निवडण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करुन दिली आहेत. यामधून उमेदवारांना चिन्हाची मागणी करता येणार आहे. निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेश, 1968 नुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना विहीत पद्धतीने चिन्हांचे वाटप केले जाते. दैनंदिन वापरातील वस्तू, व्यक्तिगत साधने, दळणवळणाची साधने, फळे, भाज्या, स्वयंपाकघरातील वस्तू, खेळ, कृषी क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, अत्याधुनिक संगणक युगातील साधने आदी विविध क्षेत्रातील साधनांचा मुक्त चिन्हांमध्ये समावेश करुन आयोगाने सर्वसमावेशकता जपली आहे. मुक्त चिन्हांमध्ये हेल्मेटचा समावेश करुन आयोगाने एक प्रकारे दुचाकी चालकाच्या जीविताच्या रक्षणासाठी संदेशच दिला आहे. गॅस सिलेंडर, गॅस शेगडी, रेफ्रिजरेटर, मिक्सर, प्रेशर कुकर, हंडी, कढई, तळण्याची कढई, काचेचा ग्लास, ट्रे, कपबशी, चहाची गाळणी, उखळ आणि खलबत्ता, शिमला मिर्ची, फूलकोबी, हिरवी मिरची, भेंडी, आले, मटार, फळांची टोपली, सफरचंद, द्राक्षे, नासपती (पीअर्स), फणस, अननस, अक्रोड, बिस्कीट, ब्रेड, केक आदींच्या रुपात मुक्त चिन्हे ठरविताना आयोगाने स्वयंपाकघराला मान दिला आहे.


यासोबत रिक्षा, ट्रक, हेलिकॉप्टर, जहाज अशी रस्ते तसेच जलवाहतुकीची साधने, विटा, थापी, करवत, कडी, कुलपाची चावी असे बांधकाम साहित्य, बॅट, बुद्धीबळ पट, कॅरम बोर्ड, फूटबॉल, ल्युडो, स्टम्प, हॉकी स्टीक आणि बॉल, टेनिस रॅकेट आणि बॉल अशी खेळांची साधने तसेच क्रिकेट फलंदाज, फूटबॉल खेळाडू, मोत्यांचा हार, हिरा, अंगठी असे मौल्यवान दागिने, हार्मोनियम, सितार, व्हायोलीन अशी संगीताची साधने यांच्यासोबतच अनेक विविध क्षेत्रातील चिन्हेही मुक्त चिन्हांमध्ये समाविष्ट आहेत.


मुक्त चिन्हांमध्ये नव्या- जुन्याचा मिलाफ -
जुन्या काळातील वाळूचे घड्याळ, दळणाचे जाते, उखळ, नरसाळे, धान्य पाखडण्याचे सूप, ग्रामोफोन, टाईपरायटर, डिझेल पंप ते आधुनिक काळातील लॅपटॉप, कॉम्प्युटरचा माऊस, सीसीटीव्ही कॅमेरा, पेनड्राईव्ह, रोबोट, हेडफोन अशा नव्या-जुन्याचा संगम या मुक्त चिन्हांमध्ये करण्यात आला आहे.
व्यक्तिगत वापराच्या वस्तूंना स्थान -
यामध्ये टूथब्रश, टूथपेस्ट पासून ते रेझर, साबणदानी, चप्पल, बूट, मोजे, उशी आदी व्यक्तिगत वापराच्या वस्तूंनाही चिन्हांमध्ये स्थान मिळाले आहे.

Last Updated : Apr 2, 2019, 5:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details