महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण; मुंबईत वाहतूक विभागाच्या डिजीटल बोर्डवर निकाल - vvpt

निवडणूक निरीक्षक यांच्या देखरेखीखाली मतमोजणी होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार राज्यात मतमोजणीची संपूर्ण तयारी झाली आहे. मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे.

राज्यात लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

By

Published : May 21, 2019, 7:18 PM IST

Updated : May 21, 2019, 8:01 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणूकीची मतमोजणी गुरुवार २३ मे रोजी होणार असून, राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जनतेला निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. हे निकाल मुंबई शहरात वाहतुक विभागाच्या डिजिटल साईन बोर्डवर निकालाची माहिती दिली जाणार आहे.

राज्यातील ४८ लोकसभेच्या जागांसाठी २३ मे २०१९ रोजी फेरी पद्धतीने निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. निवडणूक निरीक्षक यांच्या देखरेखीखाली मतमोजणी होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार राज्यात मतमोजणीची संपूर्ण तयारी झाली आहे. मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यात मतदानासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ व्हीव्हीपॅट यंत्रांमधील पावत्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. याअनुषंगानेही मतमोजणी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

जनतेला मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहण्यास मिळणार आहे. तसेच १९५० या टोल फ्री क्रमांकावर आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या व २४ तास कार्यरत असलेल्या नियंत्रण कक्षातील 022-22040451/54 या क्रमांकावर देखील निवडणूक निकालाची अद्ययावत माहिती मिळणार आहे. ७ मंत्रालयामध्ये माध्यम प्रतिनिधींना निवडणूक निकालाची माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हा नियंत्रण कक्ष देखील २४ तास कार्यरत राहणार आहे. मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगण, मुख्य गेट, गार्डन गेट आणि मंत्रालयासमोरील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ७ डिजिटल होर्डींगवर देखील निकालाची माहिती मिळणार आहे. याशिवाय मुंबई शहरात वाहतूक विभागाच्या डिजीटल साईन बोर्डवर देखील निकालाची माहिती देण्यात येणार आहे. मुंबईकरांना निवडणूक निकालाची माहिती जलदगतीने मिळण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत यंदा हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हास्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी हे जनतेला निकालाची फेरीनिहाय माहिती देणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

Last Updated : May 21, 2019, 8:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details