मुंबईMP Vinayak Raut :शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) मंगळवारी मुंबईतील वरळी येथे महा पत्रकार परिषद घेत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. तसंच पक्षाने सर्व पुरावे आणि कागदपत्रे दिल्यानंतरही विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा अन्यायकारक आहे. त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. आता जनताही या प्रक्रियेत सहभागी होईल, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह याबाबत लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असं सूतोवाच केलं. यामुळे शिवसेना ठाकरे गट आता नवीन नाव धारण करणार का? आणि मशाल या चिन्हाबाबत अद्यापही अंतिम अधिकृत मान्यता न झाल्यानं चिन्ह बदलही होणार का? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. (General Press Council)
'या' स्थितीवर चर्चा सुरू :साहजिकच येणाऱ्या लोकसभा निवडणुका या शिवसेना ठाकरे गट या नावाने लढवल्या जातील की नव्या पक्षाची नोंदणी केली जाईल? आणि एवढ्या अल्पावधीत नवीन पक्ष मतदारांपर्यंत पोहोचेल का? असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. निवडणुकांच्या तोंडावर नव्या पक्षाची नोंदणी करणं आणि नवीन चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवणं हे अवघड आहे. त्यामुळे अशा स्थितीत नेमकं काय केलं जाईल याबाबत चर्चा सुरू आहे.
मशाल चिन्हावरच लढणार :या स्थितीविषयी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आमच्यासमोर सध्या अशा पद्धतीचा कुठलाही प्रश्न निर्माण झालेला नाही. आमचा पक्ष सध्या शिवसेना ठाकरे गट या नावानं जनतेत काम करीत आहे आणि आमचं चिन्ह मशाल आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये पक्षाच्या नावाबाबत आणि चिन्हाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. जोपर्यंत तो होत नाही, तोपर्यंत आम्ही शिवसेना ठाकरे गट या पक्षाच्या नेतृत्वाखालीच काम करत आहोत. तसंच मशाल हे चिन्ह आम्ही वापरत आहोत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठीसुद्धा पक्षाचं हेच नाव आणि हेच चिन्ह आम्ही वापरणार आहोत.
अद्याप निर्णय नाही :या संदर्भात बोलताना कायदेतज्ञ ॲड. असीम सरोदे म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटानं पक्षाच्या नावाबाबत आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. तसंच विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधातही सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण सुरू आहे. जोपर्यंत या प्रकरणांचा निकाल लागत नाही. तोपर्यंत निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला दिलेलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह कायम राहणार आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नवीन पक्षाची नोंदणी करण्याचा अथवा नवीन चिन्हासाठी जाण्याचा काही प्रश्न आहे, असं मला वाटत नाही. त्यामुळे सध्या तरी शिवसेना याच नावानं आणि चिन्हानं लढेल, अशी शक्यता असल्याचं ॲड. असीम सरोदे यांनी सांगितलं.
हेही वाचा:
- मुख्यमंत्र्यांनी दावोसला दलाल नेले; मुख्यमंत्री शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर अंबादास दानवेंची टीका
- बावनकुळे स्पष्टच बोलले, सुशीलकुमार शिंदेंना भाजपाने कसलीही ऑफर दिली नाही
- नेदरलँडमध्येही प्रभू श्रीरामाची चलती, चर्च खरेदी करून बांधली राम मंदिरं!