मुंबई Lok Sabha Elections २०२३ : मुंबई महापालिका, लोकसभा तसंच विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. मात्र, त्याआधीच रणनीती आखली जात आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट तसंच ठाकरे गटाकडून मतदारसंघात उमेदवारांबाबत चाचपणी सुरू आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. सध्या याठिकाणी गजानन किर्तीकर खासदार आहेत. शिवसेनेच्या बंडानंतर किर्तीकरांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर त्यांचे सुपुत्र अमोल किर्तीकर हे ठाकरे गटात आहेत. तसंच लोकसभा निवडणूक भाजपा- शिंदे गट एकत्र लढवणार असल्यामुळं या जागेवर भाजपानं दावा करण्याआधीच शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. या जागेवर रामदास कदम यांचा मुलगा सिद्धेश कदम यांना उमेदवारी मिळणार का? यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जातायेत.
...तर आमचा गजाभाऊंना पाठिंबा : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून सिद्धेश कदम निवडणूक लढवणार असल्याचं माध्यमातून ऐकल्याचं रामदास कदम यांनी म्हटलंय. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच सिद्धेश कदम यांच्यात चर्चा झाली असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. सध्या गजानन किर्तीकरांची प्रकृती ठीक नाही, पण गजानन किर्तीकर निवडणूक लढवणार असतील तर या मतदारसंघात आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असं रामदास कदम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलंय.
रामदास कदमांकडूनच वातावरण निर्मिती? : एकीकडं शिवसेना-भाजपा युतीनं 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार गजानन किर्तीकर विजयी झाले होते. त्यावेळी त्यांना भाजपा शिवसेनेची मतं मिळाली होती. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. कारण शिवसेनेत उभी फूट पडल्यानं ही जागा नेमकी कोणाला मिळणार? याबाबत अद्याप स्पष्टता नाही.